आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. ते मी विसरलेलो नाही. तो निर्णय तर होणारच आहे. मात्र आधी या शहराची तहान भागवण्यासाठी, विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीराजेंना आदर्शवत वाटेल, अभिमान वाटेल असे शहर आधी करू, मग ‘संभाजीनगर’ होणारच आहे. नाही तर महाराज मला रायगडावर नेऊन ‘टकमक टोक’ दाखवतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (८ जून) जाहीर सभेत केली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमान’ सभेत मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आले होते. उद्धव ठाकरेंनी आजवरच्या प्रत्येक सभेची सुरुवात राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी केली. मात्र यंदा प्रथमच ८.१५ ते ८.३० अशी सुरुवातीची पंधरा मिनिटे त्यांनी औरंगाबादच्या विकासावर भाष्य केले. शहरासाठी आम्ही नवीन पाणीपुरवठा योजना तर मंजूर केलीच आहे. मात्र १९७२ च्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठीही हवा तेवढा निधी आपण देणार आहोत. नवी योजना दोन वर्षांत पूर्ण होणारच आहे. मात्र ती पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला तुरुंगात टाकू, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
आमदार मुलाने भाजपला सांगावे बाबरी मशिदीच्या आंदोलनात शिवसैनिक नव्हते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुमच्या शहरातील भाजपचे आमदार (अतुल सावे) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आले आहेत. त्यांचे वडील मोरेश्वर सावे शिवसेनेचे खासदार होते, ते व त्यांचे सहकारी कारसेवेत सहभागी होते. त्यांच्या मुलाने आपल्या पक्षातील नेत्यांना सांगावे की आपले वडील अयोध्येत गेले होते की नाही?
वडील अयोध्येत गेले, पण सेनेने त्यांना संपवले : आ. अतुल सावे
आमदार अतुल सावे म्हणाले, ‘कारसेवेत सहभागी होऊन माझ्या वडिलांनी तेव्हा शिवसेनेची लाज राखली. पण अशा हिंदुत्ववादी रामभक्त खासदाराचे शिवसेनेने मात्र राजकारणात उच्चाटन केले. प्रखर हिंदुत्ववादी मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने राजकारणातून संपवले. ठाकरे कारसेवक म्हणून सावेंचा गौरव करतात; परंतु त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल का बोलत नाहीत?’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.