आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीआरएस’:आधी ‘बाभळी’चा प्रश्न सोडवा ; मुख्यमंत्री राव यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये कार्यक्रम

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत रविवारी नांदेडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात गडचिरोली आणि रायगड जिल्ह्यातील नेते, काही जिल्हा परिषद सदस्य आणि काही सरपंच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘बीआरएस’ पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. मात्र, गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटप, बाभळी प्रकरणावरून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये वाद आहेत. अगोदर नांदेड जिल्ह्यातील ‘बाभळी’चा प्रश्न सोडवावा आणि मगच महाराष्ट्रात यावे, अशी भूमिका मराठवाड्यातील जलतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी मांडली आहे.

तेलंगण राज्य होण्यापूर्वी बाभळी प्रकरणावरून आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात वाद सुरू आहे. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षनेते असताना बाभळी प्रकरणावरून बंधाऱ्यासमोर येऊन बेमुदत उपोषण केले होते. या प्रकरणात त्यांना औरंगाबादमध्ये अटकदेखील झाली होती.

‘बाभळी’प्रकरणी न्यायालयाचा निर्णय } २.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) क्षमता असलेल्या बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी १ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत उघडेच राहतील. गोदावरी नदीतून पाणी वाहण्यास बंधाऱ्यामुळे कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. } दरवर्षी २९ ऑक्टोबर ते ३० जून या कालावधीत बाभळी बंधातून होणारा पाणीवापर २.७४ टीएमसीपेक्षा जास्त नसेल, तसेच या साठ्यापैकी ०.६ टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्य दरवर्षी १ मार्चला आंध्र प्रदेशासाठी गोदावरीत सोडून देईल. महाराष्ट्र बाभळी बंधाऱ्यातील पाण्याचा वापर वारंवार करणार नाही. } वरील अटींचे पालन होते की नाही, हे बघण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. समितीच्या प्रमुखपदी केंद्रीय जल आयोगाचे प्रतिनिधी असून आंध्र व महाराष्ट्राचा एक प्रतिनिधी राहील.

पाणीप्रश्नातून मार्ग काढा, मगच या : राजूरकर याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना काँग्रेस आमदार अमर राजूरकर म्हणाले की, तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी तेलंगणाकडे बाभळीबाबत चर्चेसाठी पत्र पाठवले. मात्र, चंद्रशेखर राव यांनी याकडे दुर्लक्ष केले. श्रीराम सागर धरण भरल्यानंतर हे पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे सरकारने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अगोदर पाण्याचा प्रश्न सोडवावा, मगच राव यांनी येथे यावे.

महाराष्ट्राला बसतोय तेलंगणाचा फटका : नागरे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे म्हणालेे की, महाराष्ट्राला तेलंगणाच्या धोरणाचा फटका बसत आहे. पोचमपाड धरणावेळी शंकरराव चव्हाण यांनी सहकार्य केले होते. कालेश्वरम प्रकल्पाबाबतही राज्य सरकारने सहकार्य केले. या प्रकल्पाचा गडचिरोली जिल्ह्याला फटका बसला आहे. बाभळीतून जाणाऱ्या पाण्यामुळे श्रीराम सागर धरण भरते व उर्वरित पाणी समुद्रात जाते. ते महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मिळाल्यास त्याचा फायदाच होईल. राव यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी नांदेडच्या पाण्याबाबत प्रश्न सोडवावा.

पाण्याबाबत जनआंदोलन होत नसल्याचा फटका बाभळी प्रकरणात चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केले होते. इतर राज्यांतले नेते त्यांच्या पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडतात. महाराष्ट्रात मात्र कुठलेही जनआंदोलन होत नाही. पाण्याच्या प्रश्नावर नेते, जनता जागरूक नसल्याचा फटका बसतो. त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या बाभळीच्या निर्णयाबाबत कुणीही बोलत नाही. -प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...