आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रज्ञानाचा आधार घेऊन घेण्यात येत असलेल्या आॅनलाईन परीक्षेचा फज्जा उडत असून परीक्षा देताना विद्यार्थ्यांची मात्र कसरत सुरू आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे बीकॉमच्या विद्यार्थ्यांना सात तास परीक्षेसाठी प्रतिक्षा करावी लागली. तर विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात परीक्षेसाठी भटकंती करावी लागली. परीक्षा विभागाच्या अजब नियोजनाचा ‘ड्रामा’ दिवसभर सुरू असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
कोरोनाच्या काळात परीक्षा होणार की नाही या रंगलेल्या वादातून वाट काढत अखेर परीक्षा जाहीर झाल्या. कोरोना संसर्ग वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाईन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा अॅडव्हान्स अकाऊंटचा पेपर होता. सकाळी ९ ते १२ या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज असतानाच त्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या. काही वेळ जात नाही तोच प्रश्न अभ्यासक्रमा व्यतिरिक्त असल्याचे विद्यार्थ्यांना जाणवले. अॅडव्हान्स अकाऊंटंट ऐवजी स्टॅटस्टिक विषयाचे प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी ही बाब परीक्षा विभागाला कळविली. चुक लक्षात आल्यानंतर परीक्षा विभागाने स्टॅटेस्टी विषयाची प्रश्नपत्रिका बदलून पाठविली. मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना ६० गुणां ऐवजी ३० गुणांचीच प्रश्नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा विभागाशी संपर्क साधला. घोळ कायम असल्याचे निदर्शनात आल्याने परीक्षा विभागाने नव्याने प्रश्नपत्रिका पाठवली. या खेळामध्ये तब्बल सात तास उलटून गेले. सकाळी ९ वाजेचा पेपर सायंकाळी ४ वाजता सोडविण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढवली. तर दुसरीकडे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची वाणिज्य विभागात आसनव्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी जास्त झाल्याने विद्यार्थ्यांना भूगोल विभागात स्थलांतरीत करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचा दीड तास गेला. तांत्रिक अडचणींचा सामना करण्यास परीक्षा विभाग असमर्थ ठरल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागले होते.
विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाचीही फरपट
चूक लक्षात आल्यामुळे परीक्षेची वेळ १२ ते १ करण्यात आली. इतकेच नव्हे तर पेपरसाठी ५० ते ६० प्रश्न राहणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु ऐनवेळी केवळ पेपरमध्ये ३० प्रश्न होते असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्याची व्यवस्था करावी लागल्याने महाविद्यालय प्रशासनाचीही धांदल उडाली होती. विद्यापीठाच्या या गोंधळामुळे शहराबाहेर असलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे.
विद्यार्थ्यांना मनःस्ताप
ऐनवेळी झालेल्या या प्रकारामुळे आमची परीक्षा देण्याची मनःस्थिती राहिली नव्हती. ऑनलाईन परीक्षा असल्याने आम्ही घरी होतो. मात्र ऐनवेळी ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सांगितल्या गेल्यावर आम्हाला लगबगीने कॉलेज गाठावे लागले. तेथेही बऱ्याच समस्यांचा सामना करत आम्ही अखेर पेपर दिला. -ऋषिकेश देशपांडे विद्यार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.