आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षण अभियान:हिंगोली जिल्ह्यातील पाच शहरांची स्वच्छ सर्वेक्षण अभियानाकडे वाटचाल, सह आयुक्तांच्या पाठीवर कौतुकाची थाप

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • केलेल्या कामाचे समाधान : रामदास पाटील, सहआयुक्त नगरपरिषद, हिंगोली

नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली नगरपालिकेने देशात यश संपादन केल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यानंतर आता पाचही शहरांनी या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पारितोषिक मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हिंगोली पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त रामदास पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली पालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या अभियानात पाटील यांनी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनाही सहभागी करून घेत हे अभियान यशस्वीपणे राबवले. त्यामुळे देशातील पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये हिंगोलीचा सहभाग नोंदवला गेला. त्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने पाटील यांचा सत्कार केला.

राज्याच्या नगरविकास विभागाने नुकतेच सह आयुक्त पाटील यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्व शहरे या अभियानात सहभाग घेऊन यश मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राज्य शासनाकडून मिळालेल्या शाबासकीनंतर आता सहआयुक्त पाटील यांनी हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नगर पंचायतींना मार्गदर्शन करून या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी वसमत व कळमनुरी येथे भेट देऊन पाहणी केली तसेच औंढानागनाथ येथेही भेट दिली.

या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन यश मिळवण्यासाठी काय नियोजन करावे लागेल याबाबत पाटील यांनी आवश्यक त्या सुचनाही दिल्या आहेत. पुढील काळात सेनगांव व हिंगोली शहरातही याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये वृक्ष लागवड घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी, व्यवस्थापन यासोबतच कर वसुली व इतर बाबींवरही लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे आता चालू वर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हिंगोली जिल्ह्यातील पाच ही शहरे देशाच्या स्वच्छ शहरांच्या यादीत झळकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

केलेल्या कामाचे समाधान : रामदास पाटील, सहआयुक्त नगरपरिषद, हिंगोली
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशातील 100 शहरांच्या यादीमध्ये हिंगोली शहर झळकले आहे. राज्य शासनानेही उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान वाटते आहे. पुढील काळात पाचही शहरे केंद्राच्या यादीत झळकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन रामदास पाटील सहआयुक्त नगरपरिषद हिंगोली यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...