आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती चोरून एका खासगी संकेतस्थळाच्या मदतीने बनावट, बोगस मतदान कार्ड तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील गजानननगर भागात उघडकीस अाला. डिजिटल सर्व्हिस सेंटर, मल्टी सर्व्हिसेसच्या नावाखाली हरीश धुराजी वाघमारेे व नवनाथ भक्तदास शिंदे हे दाेन तरुण रॅकेट चालवत होते. महसूल प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांच्या मदतीने डमी ग्राहक पाठवून छापा टाकत दोघांना अटक केली. केवळ सरकारी व सरकारतर्फे नियुक्त एजन्सीलाच मतदान कार्ड तयार करण्याचा अधिकार असताना खासगी एजन्सीमार्फत सर्रास हा गाेरखधंदा सुरू असल्यामुळे अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.
काही दिवसांपूर्वी एक तरुण तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात मतदान कार्ड तयार करण्यासाठी गेला होता. त्याची प्रक्रिया पार पडली नाही. काही दिवसांनी तो पुन्हा गेला असता त्याने मी २०० रुपयांमध्ये बाहेरून कार्ड तयार करून घेतल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्याच्याकडचे नवीन कार्ड पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. मागील आठ महिन्यात कार्डचे वाटपच झालेले नसताना त्याच्याकडे कार्ड आले कसे, याची चौकशी सुरू झाली. तेव्हा पुंडलिनगरमधील एका तरुणाकडून तयार करून घेतल्याचे समोर आले. तहसीलदार शंकर लाड यांनी नायब तहसीलदार रेवणनाथ सीताराम ताठे यांना याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना वरिष्ठांनी छापा टाकण्याचे अादेश दिले.
गजानन कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या हरीशच्या मातोश्री डिजिटल सेवा या दुकानात जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात अाले. तिथे मतदान कार्ड तयार करण्यासाठी ५०० रुपये लागतील, असे हरीशने त्याला सांगितले. पैसे दिल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हरीशने त्याला कार्ड तयार करून दिले. त्याच वेळी सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी दुकानात छापा मारला.
हरीशने कार्ड दिल्यानंतर त्याचे स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी हनुमान चौकातील विलास प्रकाश कांबळे यांच्या सुपर फास्ट महा ई सेवा केंद्राला मेल केले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी हरीशला तिथे नेले. त्या ठिकाणी नवनाथ भक्तदास शिंदे (२६) याने स्मार्ट कार्डची प्रिंट काढून ठेवलेली होती. पाेलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, तहसीलदार शंकर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार ताठे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे, धनाजी आढाव, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, माया उगले यांनी ही कारवाई केली.
निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यात केले होते जागे
१६ सप्टेंबर, २०१९ रोजीच निवडणूक आयोगाने बेकायदेशीर मतदान कार्डची निर्मिती, मुद्रण व वाटपासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यात उल्लेख केल्यानुसार, मतदान ओळखपत्र हे विविध शासकीय योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मान्यताप्राप्त व अधिकृत संस्थांद्वारेच छायाचित्रासह त्याची छपाई करण्यात येते. परंतु तरीही बनावट, बोगस कार्ड तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून गंभीर बाब असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तत्काळ अशांचा शोध घेण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, पोलिसांच्या मदतीने कारवाई करून गुन्हा दाखल करावा व त्याचा अहवाल माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
खासगी संकेतस्थळाद्वारे असे बनते बनावट मतदान कार्ड :
अाराेपी एमकाॅमचा विद्यार्थी
अाराेपी हरीश एम.कॉमचा विद्यार्थी आहे. अवघ्या ५०० ते ६०० रुपयात तो मतदान, आधार कार्ड तो तयार करून देत होता. हा सर्व प्रकार इंटरनेटवरून शिकल्याचे ताे सांगताे. ते वापरत असलेल्या ‘प्रिंट्स कार्ड’ संकेतस्थळाचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे, मनपा निवडणुकीच्या ताेंडावर अनेक मल्टिसर्व्हिसेस दुकानांतून असे अनेक बोगस मतदान कार्ड तयार झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एकट्या हरीशनेच ५० हून अधिक बोगस मतदान कार्ड तयार केल्याचे कबूल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.