आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:औरंगाबादेत लसीकरणासाठी पाच नवीन केंद्रे, दोन कोविड केअर सेंटर, रुग्णसंख्या वाढू लागल्याने महापालिकेची खबरदारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विनामास्क फिरणाऱ्या ३९ लाेकांना ३७ हजार दंड

कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने शहरात आणखी पाच लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढत असल्याने कांचनवाडीचे सीएसएमएसएस येथील कोविड सेंटरही सुरू करण्यात आले आहे. गुरुवारपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरातील सात सेंटर्सवर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीकरण मोहिमेला ज्येष्ठांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून बुधवारपासून कोरोना लसीकरणासाठी आणखी पाच नवीन सेंटर सुरू करण्यात आले. मनपाच्या तीन सेंटरसह घाटी रुग्णालय, ईएसआयसी, छावणी परिषद, सीएसएमएसएस या सेंटरवरही कोरोना लसीकरण केले जात आहे.

दिवसभरात १३४० ज्येष्ठांनी घेतली लस : बुधवारी दिवसभरात ११५० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. त्यासोबतच इतर आजाराच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या १९० नागरिकांना लस देण्यात आली. तीन दिवसांत एकूण २२१५ जणांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत १२ हजार २४० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला तर ४ हजार ३०२ जणांनी दुसरा डोस घेतला. ५०७३ फ्रंट लाइन वर्कर्सनी आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, सिडको बसस्थानकाजवळील दंडे हॉस्पिटलमध्ये मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगरच्या नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असून ही लस मोफत दिली जाणार आहे.

या नव्या सेंटरवर लसीकरणाची व्यवस्था : सादातनगर आरोग्य केंद्र, राजनगर आरोग्य केंद्र, संग्रामनगर उड्डाणपूलाजवळ, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, आयएमए हॉल शनी मंदिर, बायजीपुरा आरोग्य केंद्र या पाच सेंटरवर कोरोना लसीकरण सुरू केले जाणार आहे.

विनामास्क फिरणाऱ्या ३९ लाेकांना ३७ हजार दंड
कोरोना प्रतिबंधक नियम नागरिक पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत अाहे. मंगळवारी २४ पथकांनी विनामास्क फिरणाऱ्या ३९ नागरिकांकडून १९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे व प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा लाेकांकडून ३७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. रस्त्यावर थुंकणाऱ्या ५५ नागरिकांकडून प्रतिव्यक्ती शंभर रुपयांप्रमाणे पाच हजार ५०० रुपये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या सहा जणांकडून ९०० रुपये, विविध ठिकाणी भाजी, फळ व इतर विक्रेत्यांकडून प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याप्रकरणी ११,५०० रुपये दंड वसूल केला. समर्थनगर येथील विशाल खंडेलवाल यांच्याकडे कॅरीबॅगचा साठा आढळल्याने त्यांना पाच हजार रुपये दंड ठाेठावला.

सरकारी कार्यालयांत आठ अभ्यागत पॉझिटिव्ह
शहरातील पाच प्रमुख शासकीय कार्यालयांत येणाऱ्या अभ्यागतांना कोरोनाची अ‍ँटिजन चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. सोमवारी पाच ठिकाणी एकूण ४०१ अभ्यागतांची चाचणी केली. यात पाच जण पॉझिटिव्ह निघाले. यात पालिका मुख्यालयात २९ पैकी एक, पोलिस आयुक्तालयात ५३, जिल्हाधिकारी कार्यालय १०२ मध्ये एकही पॉझिटिव्ह नाही. विभागीय आयुक्तालयात १२५ पैकी दोन तर आरटीओ कार्यालयात ९२ पैकी पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...