आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमान:ईडीविरोधी आंदोलनात नाव घेतले नाही म्हणून खैरे शहरप्रमुखांवरच भडकले

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने कारवाई केली, असा आरोप करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे सोमवारी धरणे आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये नाव घेतले नाही म्हणून माजी खासदार, नेते चंद्रकांत खैरे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यावर चांगलेच भडकले. मी मराठवाड्याचा नेता आहे. माझ्याऐवजी त्याचे नाव का घेतो, असा सवालही केला. त्यामुळे ईडीच्या कारवाईऐवजी गटबाजी, मानापमानावरून वादाचीच चर्चा अधिक झाली. विशेष म्हणजे रविवारी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी उभारलेल्या मंचावरच उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन झाले.

राऊत यांच्या समर्थनासाठी १ आॅगस्ट रोजी क्रांती चौकात धरणे आंदोलन होणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे माध्यमांना कळवले. त्यात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये खैरे यांचेही नाव होते. सोमवारी सकाळी ११ वाजता कार्यकर्ते जमा होत असताना बाळासाहेब थोरात यांनी आंदोलन नेमके कशासाठी आहे, हे सांगणे सुरू केले.

एक कान मंचाकडे लागला होता : थोरात मंचावरून घोषणा देत असतानाच चंद्रकांत खैरे ११.३० च्या सुमारास क्रांती चौकात दाखल झाले. खैरे माध्यमांशी बोलत असताना त्यांचा एक कान थोरात नेमके काय सांगत आहेत, याकडे लागलेला होता. एक-दोन मिनिटांतच खैरे यांच्या असे लक्षात आले की, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची नावे थोरात सांगत आहेत. आणि त्यात आपले नावच जाहीर होत नाहीये. म्हणून त्यांनी तेथूनच थोरातांना खुणावलेही. पण त्यांच्या ते लक्षात आले नाही. त्यामुळे खैरे चांगलेच भडकले. मी मराठवाड्याचा नेता आहे. माझे नाव घेत नाही आणि तो जिल्हाप्रमुख (अंबादास दानवे) आहे तरी त्याचे नाव कसे काय घेतो, असे ते विचारू लागले. त्यावर थोरात यांनी चुकून झाले असावे. ठरवून तुमचे नाव टाळले नाही, असे सांगितले. पण खैरे एेकण्यास तयार नव्हते.

वाद मिटवण्यासाठी सुरू केली अचानक घोषणाबाजी
खैरे-थोरातांमधील वाद वेगळ्या वळणावर जाण्याची िचन्हे दिसताच आमदार दानवे आणि इतरांनी मग ईडीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यात खैरे सहभागी झाले. आंदोलन संपल्यावर माध्यमांचे काही प्रतिनिधी दानवे यांची प्रतिक्रिया घेत असल्याचेही पाहूनही खैरे नाराज झाले होते. मात्र, दानवे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, सायंकाळी खैरे म्हणाले, आम्ही आंदोलन केले ते महत्त्वाचे आहे. नको त्या गोष्टीला महत्त्व देऊ नका.

गैरसमजामुळे आमच्यावर रागावले
खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गैरसमजामुळे ते आमच्यावर रागावले. परंतु आम्ही शिवसैनिक आहोत. वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांनाही तेवढाच मान देतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही.
- बाळासाहेब थोरात

राम मंदिराचे ११ लाख घरात
जैसी करनी वैसी भरनी या नुसार राऊतांवर कारवाई झाली. राम मंदिर उभारणीसाठी एकनाथ शिंदेंनी दिलेले ११ लाख रुपये राऊतांनी घरात ठेवले असावेत, अशी मला शंका आहे. वाईट याचे वाटते की राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा, शिवसेनेचा, शिवसैनिकांचा विश्वासघात केला.
- संजय शिरसाट, आमदार

बातम्या आणखी आहेत...