आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळ:ज्येष्ठांसाठी एसटीचा माेफत प्रवास ही अफवाच, एसटी महामंडळाची अशी योजना नाहीच

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

ज्येष्ठांसाठी एसटी महामंडळाने ४ हजार किमी माेफत प्रवासाची सवलत दिली आहे. त्यासाठी ६५ वर्षांवरील नागरिकांनी फक्त ५५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यायचे आहे... असे मेसेज एसटी महामंडळाच्या लाेगाेसह साेशल मीडियात व्हायरल हाेत आहेत. मात्र महामंडळाने अशी काेणतीही याेजना जाहीर केलेली नाही. प्रवाशांनी व ज्येष्ठांनी अफवांवर विश्वास ठेवून काेणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन औरंगाबादचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

एसटी महामंडळाच्या नावाचा आणि लोगो वापरून या याेजनेसंदर्भात अफवा पसरवणारे मेसेज पसरवले जात आहेत. यातून अनेकांची फसवणूक हाेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने याेजनेसंदर्भात खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता साेशल मीडियावरील मेसेज चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे सांगण्यात आले. ‘महामंडळाकडून अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आली नाही. याबाबत कुणाशीही कोणताच व्यवहार करू नये. याबाबत कुणाची फसवणूक झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे अरुण सिया यांनी सांगितले.

योजनेची अशी पसरतेय अफवा
ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर... महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ४००० किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे. त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. आपले आधार कार्ड व मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप देऊन आणि ५५ रुपये भरून आपणास जवळच्या एसटी डेपोत हे कार्ड मिळेल. जाताना स्वतःचा मोबाइल नेण्यास विसरू नये. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. काही भागात ही वेळ असू शकेल. असे मेसेज फिरत आहेत. मात्र ते पूर्णपणे खाेटे असल्याचेही एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...