आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा महोत्सवाचा समारोप:24 वर्षांत पहिल्यांदाच यजमान विद्यापीठ संघाने पटकावली ‘जनरल चॅम्पियनशिप’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजभवनतर्फे आयोजित पाचदिवसीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबाॅल मैदानावर खेळाडूंच्या अपूर्व जल्लोषात बक्षीस वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, २४ वर्षांच्या इतिहासात म्हणजेच क्रीडा महोत्सव सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच यजमान विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट संघाचे चषक जिंकता आले. मुलांनी चार सुवर्णपदके जिंकत ‘जनरल चॅम्पियनशिप’वर विद्यापीठाचे नाव कोरले. मात्र, मुलींच्या संघाला कबड्डी, खो-खो स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अथेलिटिक्समध्ये चांगली कामगिरी केली नाही.

क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल खेळ होते. चार मुख्य क्रीडा प्रकारांत पुरुष व महिला गटात ३७२ सामने खेळवण्यात आले होते. साखळी व बाद फेरी, उपांत्य व अंतिम सामन्यांचाही त्यात समावेश आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेत ९८ सामने झाले. बास्केटबॉल व कबड्डीत प्रत्येकी ९३ सामने झाले. खो-खो मध्ये ८८ सामने खेळले गेले. अ‍ॅथलेटिक्स गटात १४ प्रकारच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत २२ विद्यापीठांच्या २ हजार ३८९ खेळाडूंनी सहभाग घेतला. ३४५ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक होते. १४० तज्ज्ञ पंचांनी परीक्षण केले.

२४ पैकी ३ वेळा मान; डॉ. अलेक्झांडर यांनी सुरू केला होता महाेत्सव विद्यापीठाला २४ पैकी ३ वेळा क्रीडा महोत्सवांचा मान मिळाला. मात्र, २४ वर्षांत पहिल्यांदाच ‘जनरल चॅम्पियनशिप’ची ट्रॉफी जिंकण्याची संधी यजमान संघाला मिळाली आहे. त्यासाठी संघाला २६० गुण मिळवावे लागले. सावित्रीबाई फुुुले विद्यापीठाला २२० गुणांसह दुसरे स्थान मिळाले. मुलांच्या संघाचे सर्वसाधारण विजेतेपद यजमान संघाने तर मुलींच्या गटातील २०० गुणांसह विजेतेपद पुणे विद्यापीठाला मिळाले. राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी २४ वर्षांपूर्वी अश्वमेध क्रीडा स्पर्धा सुरू केली होती. मात्र, काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे अश्वमेध नाव बदलून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव केले आहे.

बातम्या आणखी आहेत...