आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठा:भरउन्हाळ्यात मराठवाड्यात प्रथमच दाेन ऐवजी चार पाणी आवर्तने

पैठण | रमेश शेळके24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जायकवाडी धरणात मेच्या प्रारंभी ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. - Divya Marathi
जायकवाडी धरणात मेच्या प्रारंभी ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्याला सलग चौथ्या याही उन्हाळ्यात जायकवाडीची पाणी पातळी ४९ टक्क्यांवर राहिली आहे. २०१८ साली धरण मे महिन्यात मृत साठ्यात हाेते. मात्र, २०१९ पासून पावसाळ्यानंतर दिवाळीतही समाधानकारक पर्जन्यमान राहिल्याने उन्हाळ्याच्या शेवटावरही धरणात पाणीसाठा मुबलक हाेता. ताे सलग चार वर्षांपासून टिकून आहे. समाधानकारक साठ्यामुळे सलग चार वर्षांपासून उन्हाळ्यात दाेन पाणी आवर्तने मराठवाड्यासाठी दिले जाते हाेते. यंदा प्रथमच उन्हाळ्यात चार पाणी आवर्तने देण्यात येत आहेत. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मराठवाड्यातील १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर सिंचनाला पाणी सुरू आहे.

यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न, शेती, उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून गोदावरीवर पैठण ते नांदेडपर्यंत असलेल्या १४ बंधारे या पाण्याने सध्या ही ३० टक्के भरलेले असल्याची माहिती अभियंता विजय काकडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

यापूर्वी मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातील पाण्यावर उन्हाळ्यात अवलंबून राहावे लागत हाेते. समन्यायी पाणी वाटपात त्यावेळी मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा संघर्ष हाेता.

मराठवाड्यावर मागील चार वर्षांपूर्वी सतत दुष्काळ राहिल्याने जायकवाडीचा पाणीसाठा दर उन्हाळ्यात मृत साठ्यात येत राहिला, तर मागील चार वर्षांपासून १०० टक्के धरण भरून चार वेळा मुख्य गेटमधून पाणी सोडले गेले. मागील पावसाळ्यात नाशिकच्या भागातून आलेल्या पाण्याने जुलैमध्ये धरणाचा साठा १०० टक्क्यांवर आला होता. त्यावर आजही जायकवाडी ४९ टक्के पाणीसाठा आहे.

कायम दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सलग चौथ्या वर्षी दिलासा, चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

कारण : तीन वर्षांपूर्वी नगर, नाशिकच्या वरील धरणातून दिवाळीनंतर चांगल्या पर्जन्यमानामुळे धरण डिसेंबरमध्ये १०० टक्के भरले. त्यात उन्हाळ्यापर्यंत सुमारे ५० टक्के साठा टिकून हाेता. तीच परिस्थिती आजही कायम.

फायदा : उन्हाळ्यातही मराठवाड्यातील सुमारे पावणेदाेन लाख हेक्टर क्षेत्र आेलिताखाली, टँकरवर हाेणारा काेट्यवधीचा खर्चही वाचला

पुढे काय : सलग चार वर्षांपासून धरणात मुबलक साठा असल्याने मराठवाड््यातील चारही जिल्ह्यांतील क्षेत्र आेलिताखाली आली आहे. त्यामुळे कायम दुष्काळी भाग अशी येथील आेळख पुसण्यास मदत हाेणार आहे.

पाणी आवर्तनाने पाणीपट्टी वसुली वाढली
जायकवाडीत सध्या पाणीसाठा मुबलक असून डाव्या कालव्यातून पाणी मराठवाड्यातील शेतीला दिले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून पाणीपट्टी वसुली यामुळे वाढली आहे. -विजय काकडे, अभियंता पाटबंधारे विभाग, पैठण

पाच जिल्ह्यांना फायदा : जायकवाडीत ४९ टक्के साठा आहे. यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हाेताे.