आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागजानन महाराज (शेगाव) मंदिर विश्वस्त मंडळातर्फे बुधवारी श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पालखी सोहळा निघाला. कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदा महिलांनी स्वत:हून पालखीत सहभाग घेतला नसल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. पालखी सोहळ्यात २२५ वारकऱ्यांच्या वेशभूषेत पुरुष मंडळींनी बँड पथकासह “गण गण गणात बोते..’चा जयघोष केला.
सकाळी श्री गजानन महाराज मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या श्रींच्या पादुकांसह मुखवट्याचे पूजन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सपत्नीक उपस्थित होते. शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, मंदिराचे विश्वस्त डॉ. प्रवीण वक्ते, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर संजय जोशी, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. संतोष भोसले, प्रमोद राठोड, किशोर शितोळे, नीलेश राऊत, राजेश सरकटे, चंद्रकांत भराड, माधुरी अदवंत आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात फुगड्या, पावलीमुळे भक्तिमय वातावरण सागवानी लाकडाच्या चौकटीवर चांदीचा मुखवटा बसवण्यात आला. नवीन रथाचे काम करून जनरेटरची सुविधा, रथात लाइटची व्यवस्था केली. सकाळी २२५ वारकरी पायी पालखीसेाबत शेगावपर्यंत जाणार असल्याने मंदिर प्रशासनाकडून विमा काढण्यात आला. पालखी सोहळ्यात बँड पथक, घोडे तसेच महिलांनी पावली, फुगड्या खेळल्या. गजानन मंदिरापासून निघालेली पालखी पुंडलिकनगर, हनुमाननगर, एन-४ मार्गे कॅनॉट प्लेस, आविष्कार चौक, हिंदू राष्ट्र चौक, गरवारे कम्युनिटी सेंटरमार्गे श्रीक्षेत्र शेगाव येथे ३० डिसेंबरला जाणार आहे.
ठिकठिकाणी प्रसाद, फळ-पाणीवाटप पालखी सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्री गजानन महाराज व्यापारी महासंघाच्या वतीने डॉ. राजेंद्र परदेशी, अनंत जयस्वाल, विजय देवळाणकर यांच्या सहकार्याने १ हजार लाडू, १ हजार पाण्याच्या बॉटल्स, २०० डझन केळी, २०० लिटर दूध, दीड क्विंटलचे पोहे वाटप करण्यात आले. रस्त्यावर २ क्विंटल गुलाब, शेवंतीच्या फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या. पुंडलिकनगर रोड येथे माजी नगरसेवक गजानन मनगटे, भास्कर खेंडके यांच्या वतीने ५०० चिक्कीचे पाकिटे, महावीर परिवार यांच्या वतीने १ हजार पाणी बॉटल्स, १ हजार चिप्स पाकिटे वाटप करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.