आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्याची राजभवनकडून तिसऱ्यांदा संधी:विद्यापीठातील पाचही क्रीडा मैदाने सज्ज, धनराज पिल्लेंच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजभवनातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मैदाने सज्ज झाली आहेत. क्रीडा विभागाच्या 5 मैदानावर 5 खेळ प्रकार या स्पर्धेत होतील. 22 विद्यापीठांचे 2200 खेळाडू सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच सर्व खेळाडुंची पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे, राजभवनाने 24 वर्षांत तिसऱ्यांदा औरंगाबाद विद्यापीठाला यजमानपद दिले आहे.

यापूर्वी १९९८ दरम्यान क्रीडा महोत्सव घेतला गेला होता. त्यावेळी अश्वमेध नाव होते. मात्र काही संघटनांच्या आक्षेपामुळे अश्वमेध ऐवजी आता राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव असे संबोधले जाते. निवृत्त कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात (२०१४) दुसऱ्यांदा क्रीडा महोत्सव घेण्यात आला.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात ३ ते ७ डिसेंबर दरम्यान तिसऱ्यांदा महोत्सव होत आहे. अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो या पाच क्रीडा प्रकारात ११०० मुलं आणि ११०० मुली सहभागी होतील. पोर्टलवर मात्र आत्तापर्यंत १८६३ नोंदणी झाली आहे. पुढील दोन दिवस ऑनलाईन नोंदणी सुरूच राहणार आहे. गुरूवारपासूनच संघ औरंगाबादेत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते शनिवारी (३ डिसेंबर) दुपारी ३ वाजता उद्घाटन होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यांच्याच हस्ते सिंथेटिक ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन केले जाण्याची शक्यता आहे.

खेळांडुच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. युनिकचे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार, प्रोग्रॅमर दत्तात्रय पर्वत आणि राजेश राठोड यांनी हे सॉफ्टवेअर बनवले आहे. खेळाडुंची नावे, त्यांच्या खेळ प्रकाराची यात नोंद केली जात आहे. आत्तापर्यंत १८६३ खेळाडुंनी नोंदणी केली आहे. ३ डिसेंबर सकाळपर्यंत नोंदणी करता येणार असल्यामुळे त्यात दोनशे ते तीनशे खेळाडंची भर पडू शकते.

डॉ. चंद्रजीत जाधव, डॉ. उमेश सलगर (उस्मानाबाद), डॉ. एच. के. शेख व डॉ. शंकर धांडे (बीड), डॉ. यूसूफ पठाण व डॉ. सचिन देशमुख, डॉ. बप्पासाहेब मस्के व डॉ. भूजंग मस्के समन्वयक आहेत. डॉ. संदीप जगताप क्रीडा ज्योतचे समन्वयक आहेत.

बातम्या आणखी आहेत...