आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20:परदेशी पाहुण्यांना काही ठिकाणी डांबरी जोडरस्त्यानेच अजिंठ्याकडे जावे लागेल - जिल्हाधिकारी पांडेय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्ण रस्ता काँक्रिटीकरणास वेळ लागेल

आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. पण त्याला तत्काळ यश येणे कठीण दिसते. त्यामुळे जी-२०च्या निमित्ताने येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना अजिंठ्याकडे जाताना काही ठिकाणी डांबरी जोडरस्त्यानेच जावे लागेल, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. पाच महिन्यांपूर्वी जी-२०ची पहिली बैठक झाली. त्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा रस्ता युद्धपातळीवर करण्याची सूचना केली होती. यासंदर्भात पांडेय म्हणाले की, मी स्वत: काही दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवेचे पथक मेहनत घेत आहे. पण काही ठिकाणी भूसंपादनाचे तर काही ठिकाणी वेळेत निवाड्याचे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे दोन पुलांच्या कामांना, चौक्यातील घाटाला वेळ लागणारच आहे. अजिंठ्यापर्यंतचा रस्ता पू्र्णपणे काँक्रिटीकरण आता होणार नाही. पण पाहुण्यांच्या सोयीसाठी डांबरीकरणाचे जोडरस्ते ३१ जानेवारीपर्यंत तयार होतील. अजिंठा लेणी येथे रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करावे, असे काही जणांचे म्हणणे होते. त्यासाठी मी पाहणी केली. तेव्हा रुंदीकरणाची गरज नाही, असे माझ्या लक्षात आले. लेणीचा परिसर जंगलाचा आहे. त्यातून राष्ट्रीय महामार्ग नेण्याचा हट्ट कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.

हर्सूलचे रुंदीकरण होऊ शकते : गेल्या २० वर्षांपासून चर्चेत असलेले हर्सूलचे रुंदीकरण जी-२० च्या निमित्ताने होऊ शकते, असे सांगत पांडेय म्हणाले की, केेंद्र सरकारला यासंदर्भात मी दोन पत्रे पाठवली आहेत. पाडापाडी झाली नाही तरी किमान मालमत्ताधारकांना मोबदल्याची रक्कम दिली जाऊ शकते.

नद्यांचे अस्तित्व धोक्यात : ग्रामीण भागातील समस्या सांगायचे म्हटले तर पुस्तकच लिहावे लागेल. पण प्रामुख्याने नद्यांचे अस्तित्व धोक्यात येणे हा गंभीर मुद्दा आहे. त्याकडे लक्ष द्यावे लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...