आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुन्हा मोठा लॉकडाऊन लागण्याची भीती वाटत असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील दहा टक्के परप्रांतीय कामगार पुन्हा गावाकडे जाऊ लागले आहेत. सध्या येथे सुमारे एक लाख जण असून त्यातील सुमारे दोन हजार गावाकडे गेले आहेत. आठ टक्के जाण्याच्या तयारीत आहेत. पुढे हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजक, ठेकेदारांनी ‘निवास, जेवण, आरोग्याची काळजी घेतो; पण औरंगाबाद सोडू नका’ अशा शब्दांत त्यांची विनवणी सुरू केली आहे. झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील कामगार वाळूज महानगरात आहेत. कमी पैशात अधिक काबाडकष्ट करणारे लोक अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे कंपन्यांच्या ठेकेदारांची मदार त्यांच्यावरच असते.
गेल्या वर्षी मोठा लॉकडाऊन जाहीर झाल्यावर त्यातील बहुतांश कामगार मिळेल त्या मार्गाने घरी परतले होते. कारण त्यांची काळजी घेण्याची तयारी ठेकेदारांनी दाखवली नव्हती. मात्र, गावाकडे रोजगाराची मोठी संधी नाही, असे लक्षात आल्यावर डिसेंबरअखेर वाळूजला दाखल झाले. त्यांना परत आणण्यासाठी ठेकेदार, कंपनी मालकांनी यंत्रणा राबवली होती. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारला असता कामगारांचे जथ्थे निघाल्याचे दिसले. अधिक माहिती घेतली तेव्हा कामगारांनी सांगितले की, आता पुन्हा औरंगाबादेत मोठ्या लॉकडाऊनची शक्यता आहे. तसे झाल्यास ठेकेदार, कंपनी मालक पुन्हा आपल्याला वाऱ्यावर सोडतील, अशी भीती आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गावाकडे परतण्याचे ठरवले आहे. मात्र, काही कामगारांना उद्योजकांनी ‘गेल्या लॉकडाऊनच्या काळात तुमच्या जेवणाची व्यवस्था केली. तशीच आताही करू’ असा दिलासा दिला आहे. ते पाहून ठेकेदारांनीही निवास, आरोग्याची काळजी घेऊ, असे आश्वासन दिले.
आता अडकून पडायचे नाही : कामगारांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये इथे अडकून पडल्याने आमचे प्रचंड हाल झाले. अनेकांना एकवेळच्या जेवणावर दिवस काढावे लागले. मुला- बाळांसह पायी गावाकडे जाण्याची वेळ अामच्यासह हजारो जणांवर आली. त्या अनुभवातून आम्ही शहाणे झाल्याने आताच मूळ घराकडे निघत आहोत.’
संकटात ज्यांना सांभाळले, ते न सांगताच निघून गेलेे
मागील वर्षीच्या आर्थिक संकटातून अद्यापही सावरलो नाही तोच पुन्हा नव्याने संकट येण्याचे संकेत दिसत आहे. स्वतःच्या मुलांप्रमाणे परप्रांतीय कामगारांना सांभाळले आहे. तरीसुद्धा त्यातील काही कामगार न सांगता निघून गेले. उर्वरितांच्या विश्वासावर काम सुरू आहे. राहुल मोगले, मसिआ सचिव - उद्योजक
उद्योगांना लॉकडाऊन नको
मागील वर्षी स्वखर्चाने कामगारांना त्यांच्या गावाहून वाळूजमध्ये घेऊन आलो. त्यामुळे शासनाने उद्योगांना लॉकडाऊन लावूच नये. म्हणजे त्या आधारावर आम्ही कामगारांना दिलासा देऊ शकतो. अभिजित जाधव, लेबर काँट्रॅक्टर
कामगारांमध्ये भीती, संभ्रम
राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमध्ये लॉकडाऊनच्या बातम्या येत असल्याने कामगारांत भीती, संभ्रम निर्माण झाले. काही जण तातडीने निघून गेले; पण अनेकांना आम्ही सांभाळ करण्याचा विश्वास देऊन थांबवले आहे. मोईन पटेल, लेबर काँट्रॅक्टर
शासनाने विश्वास दिला तरच उद्योग, उद्योजक टिकेल
इलेक्ट्रॉनिक मीडियावर सतत गोंधळ उडवून देणाऱ्या बातम्या येत आहेत. शासनाचे निर्णयही ठोसपणे कळत नाहीत. त्यामुळे गोंधळलेले परप्रांतीय कामगार काही न सांगताच निघून जात आहेत. शासनाने विश्वास दिला तरच येत्या काळात उद्योग, उद्योजक टिकेल. अजय गांधी, उद्योजक.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.