आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २१ हजारांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी ठोठावला. श्रावण बाळ योजनेच्या यादीतील लाभार्थींचा सक्षम पुरावा मागणाऱ्या फुलंब्री ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल आहे. विशेष म्हणजे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी शशिकांत कुशबा पट्टेकर (२७) यांची ही फिर्याद आहे. १७ ऑगस्ट २००९ रोजी ते नेहमीप्रमाणे रुग्णालयात रुग्ण तपासत असताना मनोज तुकाराम चिकटे नावाच्या तरुणाने श्रावण बाळ योजनेची फाइल आणून त्यातील यादीप्रमाणे लोकांच्या वयाच्या दाखल्यांची मागणी केली. त्यावर नियमाप्रमाणे संबंधित व्यक्तीस पाहिल्याशिवाय आपण दाखला देणार नाही असे वैद्यकीय अधिकारी पट्टेकर यांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मनोजने फिर्यादीशी हुज्जत घातली आणि आरोपी राजेंद्र ठोंबरे यास फोन लावून ही बाब सांगितली. त्यावर आरोपी ठोंबरे, मनसुख जाधव व इतर १० ते १५ जणांसह फिर्यादीच्या केबिनमध्ये आले आणि शिवीगाळ करीत फिर्यादीला मारहाण केल्याची तक्रार आहे. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादीस भिंतीवर ढकलून देत धमकावल्याचा गुन्हा फुलंब्री पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
आठपैकी चार साक्षीदार झाले फितूर खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यातील चार साक्षीदार फितूर झाले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३५३ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंड, कलम १८६ आणि कलम ५०६ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.