आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली व कळमनुरी तालुक्यात जादा दराने धान्य वाटप करणाऱ्या चार स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून याबाबतचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी नुकतेच काढले आहेत.या गावतील लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुकानाची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य वितरण योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांकडून केल्या जात होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व दुकानांची तपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कळमनुरीत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तर हिंगोलीमध्ये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, वसमतमध्ये उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांनी तक्रारी आलेल्या दुकानांची प्राधान्याने तपासणी केली होती. त्यामध्ये काही धान्य दुकानदारांकडून जादा दराने धान्य वाटप होत असल्याचे स्पष्ट झाले होते. या शिवाय साठा व वाटप रजिष्टर व्यवस्थीत नाही, भाव फलक लावलेला नाही, ई पॉसच्या पावत्या देण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झालेहोते. त्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संबंधीत दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी नामदेव टापरे (पांगरी, ता. हिंगोली), ओमप्रकाश ठमके (आखाडा बाळापुर, ता. कळमनुरी), प्रकाश बन्सीलाल वर्मा (कळमनुरी), रामराव कांबळे (रेडगाव, ता. कळमनुरी) या चौघांचे स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबीत केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.