आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाय आई-बाबा, आय क्विट’:दोन दिवसांत चौघांनी संपवले जीवन, लॉकडाऊनमध्ये तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेंटलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण (बीडीएस) घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने ऑनलाइन लेक्चर सुरू असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. सागर महेंद्र कुलकर्णी असे मृताचे नाव आहे. महिन्यावर सागरची परीक्षा आली हाेती. त्यामुळे सकाळी वडिलांशी गप्पा मारताना आपण चांगला अभ्यास करत असल्याचे त्याने सांगितले हाेते. मात्र त्यानंतर काही तासांत त्याने ‘आई-बाबा बाय, आय क्विट’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या कारणांमुळे तणावग्रस्त असलेल्या चार तरुणांनी मागील दोन दिवसांत अशीच जीवनयात्रा संपवली, तर ३५ वर्षांखालील १६ जणांनी दीड महिन्यात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे.

तीन वर्षांपासून लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये बीडीएसचे शिक्षण घेणारा सागर औरंगाबादेतील सातारा परिसरातील ज्योती प्राइडमध्ये कुटुंबीयांसह राहत होता. त्याची आई गृहिणी, वडील घाटी रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक तर मोठा भाऊ पुण्याला नोकरी करतो. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे ताे औरंगाबादेत घरी बसून ऑनलाइन लेक्चरद्वारे अभ्यास करत हाेता. गेल्या काही महिन्यांतच त्याला स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारदेखील सुरू होते. मंगळवारी सकाळी वडिलांनी त्याला औषधे दिली. तसेच गप्पा मारत त्याच्यासाेबत चहाही घेतला. त्या वेळी ‘बाबा, चाळीस दिवसांवर माझी परीक्षा आली आहे, मात्र तुम्ही काळजी करू नका. मी चांगली तयारी करताेय,’ असे सांगून ताे आपल्या खाेलीत निघून गेला. आता ऑनलाइन लेक्चर सुरू हाेणार असल्याचेही त्याने सांगितले हाेते. साडेअकरा वाजेच्या सुमारास जेवणासाठी त्याच्या आईने त्याला आवाज दिला. मात्र बराच वेळ आवाज देऊनही सागरकडून प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या आईने शेजारच्यांसह जवळ राहणाऱ्या नातेवाइकांना ही बाब कळवली. शेजारी राहणारे सुधीर जाधव व इतरांनी धाव घेतली तर त्यांना सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून अाला. त्यांनी तातडीने त्याला खाली उतरून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बहुतेक प्रकरणांत ताण-तणावाचेच कारण
सागरच्या खाेलीत अभ्यासाचे साहित्य, मोबाइल पडून होता. ‘माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय’, असे लिहून खाली मोठ्या आकारात ‘आय क्विट’ असे लिहिलेली चिठ्ठी खाेलीत सापडली. सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुधीर चव्हाण यांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

तरुण घेताहेत टाेकाचा निर्णय
मंगळवारी दाेन तरुणांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी प्रगती कॉलनीतील मकाई गेटजवळ राहणारा इम्रान खान मुकीम खान या २७ वर्षीय सुशिक्षित तरुणाचा मृतदेह २४ मे रोजी घरात सापडला हाेता. त्याच्या मृत्यूबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

जाफ्राबादचा असलेल्या सुरेश देविदास गायकवाड (२३) याने २३ मे रोजी दुपारी जटवाड्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून रेल्वे स्टेशनजवळील राजनगर भागात भीमराव साबळे (३०) या तरुण रिक्षाचालकानेही शुक्रवारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली हाेती.धक्कादायक म्हणजे, या लॉकडाऊनमध्ये ३५ वर्षाखालील १६ तरुण-तरुणींनी मागील दीड महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे.

सुतारकाम करणाऱ्या तरुणाने संपवले जीवन
चिकलठाण्यातील सावित्रीनगरातील विलास शामराव जगताप (२७) यानेही आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उजेडात आले. एकुलता एक विलासचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले हाेते. पारंपारिक सुतार व्यवसाय ताे करत हाेता. पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी रात्री आई- वडिलांसोबत जेवण करुन ताे खोलीत गेला. सकाळी नऊ वाजले तरी तो उठला नाही म्हणून वडिलांनी आवाज दिला पण प्रतिसाद आला नाही म्हणून त्यांनी खुर्ची घेऊन दरवाजाच्या फटीतून पाहिले असता तर विलास गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांना धक्काच बसला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, सहायक फौजदार निसार शेख घटनास्थळी धाव घेतली.

जगणे सोडू नका
‘करिअरची चिंता, आर्थिक ताण, कौटुंबिक वाद या समस्या दीड वर्षात वाढल्या. नकारात्मक विचारही वाढत आहेत. परिणामी मार्चपासून शहरात मानसिक आजार, तणावाचे रुग्ण ३१ टक्के वाढले. समुपदेशन करताना १४०० जणांनी आत्महत्येचे विचार येत असल्याचे सांगितले. पण या तणावातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे व सगळे चांगलेच हाेणार आहे असा सकारात्मक विचार करायला हवा.-डाॅ. संदीप सिसाेदे, मानसोपचारतज्ज्ञ

विचार करताना लवचिकता ठेवा. साेशल मीडियावर किंचित जरी नकारात्मकता जाणवली तर त्यापासून लगेच दूर व्हा. प्रत्येकात बाउन्स बॅक करण्याची क्षमता असते. दिवसभरात एकदा जरी चांगले विचार आले तर दिवसभर ते कायम ठेवा. सहनशीलता वाढवा, चांगल्या धारणेवर भर द्या. जवळच्या व्यक्तीशी माेकळं बाेला. एखादा नैराश्यात असल्याचे जाणवले तर त्याच्याशी संवाद वाढवा. समस्यांबाबत नव्हे तर चांगल्या गोष्टींबाबत बाेला.

बातम्या आणखी आहेत...