आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांपासून मनपाच्या निधीतून १०० कोटी रुपयांचे रस्ते तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. या निधीतून ६१ रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (३ मार्च) कंत्राटदारांची प्री-बिड बैठक घेण्यात आली. या बैठकीस तीन कंत्राटदार उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने रस्त्यांची निविदा थांबवली होती. आचारसंहिता संपताच महापालिकेने १०० कोटी रुपयांच्या निधीतून चार पॅकेजमध्ये ६१ सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. ३ मार्चपर्यंत निविदा स्वीकारली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले होते. परंतु जी-२० परिषदेच्या कामामुळे निविदा मागवण्याची अंतिम मुदत १३ मार्च करण्यात आली आहे. तसेच प्री-बिडची बैठक ३ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुक कंत्राटदारांची प्री-बिड बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए. बी. देशमुख, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड तसेच तीन कंत्राटदार आदी उपस्थित होते.
स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची सूचना : कंत्राटदारांनी रस्त्यांच्या कामासाठी स्वतंत्रपणे निधीची तरतूद करून ठेवावी अशी सूचना केली. त्यावर रस्त्यांची कामे पूर्ण होताच या निधीतून कंत्राटदारांची देयके देण्यात येतील. निधीअभावी कोणतेही बिल थांबवले जाणार नसल्याचे प्रशासक डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच कंत्राटदाराकडे मशिनरी आणि प्लान्ट नसेल तर त्याने इतर कंत्राटदार कंपनीसोबत केलेल्या सामंजस्य कराराची (एमओयू) कागदपत्रे जोडावीत. कंत्राटदारांसाठी असलेली २५ लाख रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) ठेवण्याच्या अटीमध्ये बदल करून १५ लाख रुपये डिपॉझिट स्वीकारण्यात येणार असल्याची अट मान्य करण्यात आली.
४० किलोमीटर लांबीचे सिमेंट रस्ते बनवले जाणार ही निविदा चार पॅकेजमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या चार पॅकेजमध्ये प्रत्येकी १५ रस्त्यांचा समावेश असून साधारणपणे प्रत्येक पॅकेज २५ कोटींचे असेल. शहरातील ४० किमी लांबीचे सिमेंट रस्ते यातून बनवले जाणार आहेत. मनपाने शंभर कोटीच्या रस्त्यांची निविदा प्रसिद्ध केली असून १३ मार्चपर्यंत निविदा स्वीकारण्याची मुदत देण्यात आली आहे.१५ मार्च रोजी निविदा उघडण्यात येऊन तांत्रिक आणि आर्थिक (टेक्निकल अॅड फायनान्शियल) निविदा अंतिम केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.