आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात सामुदायीक संसर्ग रोखण्यासाठी (ता. ६) ऑगस्ट पासून चौदा दिवसांचा लॉकडाऊन असणार असून या काळात सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जयवंशी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा सामुदायीक संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर सर्व विभागाशी चर्चा करून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा लॉकडाऊन घेतला जाईल. यावेळी जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील. तसेच खाजगी अस्थापना देखील बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. या शिवाय जिल्ह्यात येणाऱ्या तसेच जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना परवानगी घेणे बंधनकारक आहे. सबळ कारण असल्या शिवाय त्यांना परवगानी दिली जाणार नाही.
या शिवाय हिंगोली, कळमनुरी, वसमत या शहरात दुकानदारांच्या रॅपीड अँटीजन चाचण्या केल्या जाणार आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालय ताब्यात घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असून नागरीकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जयवंशी यांनी केले आहे.
संभ्रम निर्माण करणाऱ्या छायाचित्रीकरणाकडे दुर्लक्ष करा
शहरात काही ठिकाणी नागरीकांचे संभ्रम निर्माण करणारे छायाचित्रीकरण करून सोशल मिडीयावर अपलोड केले जात आहे. मात्र नागरीकांनी संभ्रम निर्माण करणाऱ्या छायाचित्रीकरणाकडे दुर्लक्ष करावे. नागरीकांना योग्य आरोग्य सेवा व सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.