आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयम सुटला:दहा-दहा रुपये काँट्री करून चौथीची मुले पितात दारू; संतप्त मातांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

नांदेड6 महिन्यांपूर्वीलेखक: शरद काटकर
  • कॉपी लिंक
  • दारूबंदीसाठी धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथील महिलांचे आंदोलन
  • नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणाले, ठराव घ्या तत्काळ दारूबंदी करू

धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथे मद्यपींचा त्रास वाढला असून अगदी चौथीचे विद्यार्थीही दारू पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. संयमाचा बांध फुटल्याने गावातील तब्बल १८० महिलांचा मोर्चा नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शाळकरी मुलेही १०-१० रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारू पितात, या प्रकाराला कंटाळून तत्काळ दारूबंदी करण्याची आग्रही मागणी महिलांनी केली. दरम्यान, ग्रामसभा घेऊन गावातील महिलांच्या स्वाक्षऱ्या घ्या, तत्काळ दारूबंदी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिले.

धर्माबाद तालुक्यातील १४०० लोकसंख्या असणाऱ्या नायगाव (ध) या गावापासून अवघ्या दीड-दोन किलोमीटरवर तेलंगाणा राज्याची सीमा सुरू होते. येथील गावची लोकसंख्या १४०० च्या आसपास आहे. तेलंगाणाच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीत दारू मिळत असल्याने येथे दिवसभर दारू खरेदीसाठी लोकांची रिघ असते. देशी दारुच्या समोरच मंदिर आहे. तसेच बाजुला शाळादेखील आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले. दरम्यान, गावामध्ये अवैधरित्या चालू असलेले देशी दारुच्या दुकानाची चौकशी करुन तत्काळ बंद करा, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गावातील बचत गटाने महिलांना बळ दिल्याने त्यांनी मागणीचे निवेदन दिले. विजयालक्ष्मी कासनेवाल, रंजना नुनेवार, पदमा कासलेवाल, सुमित्रा मनुरे, शारदा कदम, शोभा यलपागार, गंगामनी लिंगोड, सावित्रा शामलवार आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

शाळा बंद उपद्याव्याप सुरु

गावापासून एक ते दीड किमी अंतरावर तेलंगाणा राज्य आहे. गावात जिल्हा परिषदेचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. लहान वर्गाचे २०० च्या आसपास मुले आहेत. तर मोठ्या वर्गाचे १०० ते १५० विद्यार्थी असून शाळाबंद असल्याने मुले घरीच आहेत. ऑनलाईन वर्ग, अभ्यास असा कुठलाही प्रकार येथे नाही. खायचं प्यायच आणि उनाडक्या करायचा हाच धंदा मुलांचा सुरु आहे. आई-वडिल दिवसभर शेतात असतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मुले एकत्र येऊन नको ते उपद्याव्याप करतात, असे महिलांना सांगितले.

बचतगटाचा पुढाकार

देशी-दारूमुळे आम्हाला खूप त्रास होतो. पती दारू पितात पण चौथीची मुलेही दारूच्या आहारी गेले आहेत. दिवसभर पुरुष दारु पितात रात्री महिला कामावरुन आल्यावर त्यांना मारहाण करतात. बचत गटाने पुढाकर घेतल्याने आम्ही दारु बंदीसाठी पुढे आलो आहोत.
- रेखा राजपोड, रहिवासी, नायगांव (ध)

एक वेळे बायको पण सोडतील पण

दारुमुळे महिलांनाच जास्त त्रास होत आहे. पती पत्नीला सोडतील पण दारूला सोडायला तयार नाहीत. शाळा बंद असल्याने मुलांवरही वाईट परिणाम होत आहेत. बचत गटामुळे आम्ही समोर आलो आहेत. गावातील देशी दारुचे दुकान बंद करावे.
- देऊबाई कदम, रहिवासी.

सकाळी ८ पासून लागते रांग

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान महिलांनी धर्माबादचे तहसीलदार व राज्य उत्पादन शुलक् यांच्याकडे तक्रार केली. पण फायदा झाला नाही. त्यामुळे नांदेड गाठावे लागले. गावात दारू घेण्यासाठी सकाळी ८ वाजेपासून तेलंगाणातील लोकांसह गावातील पुरूष मंडळी रांगा लावतात. तेलंगाणात देशी दारू महाग आणि चांगल्या दर्जाची नसल्याने येथे येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे महिलांनी सांगितले. दारूमुळे गावात वाद विवादाच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत, असे महिलांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...