आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:तुकडेबंदीचा असाही फटका, समृद्धीमुळे जमिनींचे गुंठ्यात तुकडे; 1,800 शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न

नामदेव खेडकर | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गामुळे 13 जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांच्या अंगणी आर्थिक समृद्धी आली. पण याच समृद्धीमुळे ज्यांच्या जमिनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विभागल्या ते शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत. कारण शिल्लक राहिलेल्या जमिनींमध्ये 20 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या तुकड्यांचे करायचे काय, असा प्रश्न राज्यातील 1800 शेतकऱ्यांसमोर आहे. तुकडेबंदी अधिनियमानुसार 20 गुंठ्यांपेक्षा कमी शेतीचे खरेदीखत होत नाही. शिवाय छोटासा तुकडा आणि त्यालाही जायला रस्ताच नउर्वरित.

शेतकऱ्यांना ते कसायलाही अडचणीचे
नागपूर ते मुंबई या ७०१ किमी लांब आणि ४०० फूट रुंद एक्सप्रेस वेसाठी (समृद्धी महामार्ग) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २२ हजार एकर जमीन संपादित केलेली आहे. सध्या नागपूर ते शिर्डीपर्यंत रस्त्याचे कामही पूर्ण होत आले आहे. या रस्त्यासाठी जमिनी संपादित करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे तुकडे झाले. आता शिल्लक जमिनींपैकी दोन्ही बाजूंनी दोन तुकडे राहिलेले आहेत. यात जवळपास १८०० शेतकऱ्यांच्या जमिनींचे २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रफळाचे तुकडे झाले आहेत.

सर्व्हे : भूसंपादन परवडणारे नाही
एमएसआरडीसीने एका बाजूची शिल्लक जमीन खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एमएसआरडीसीच्या भूसंपादन विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात राज्यात असे 1800 शेतकरी असल्याचे समोर आले. ते तुकडे खरेदी करण्यासाठी एमएसआरडीसीला 1400 कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज होता. हे तुकडे जसे शेतकऱ्यांच्या काहीच कामाचे नाहीत, तसे एमएसआरडीसीच्याही कामाचे नसल्याने एमएसआरडीसीने तुर्तास हे तुकडे खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

एमएसआरडीसीच्याही कामाचे नाहीत
औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धीमुळे ज्यांच्या जमिनी दोन्ही बाजूंनी विभागल्या आणि छोटेछोटे तुकडे झाले, असे शेतकरी आमच्याकडे जमीन खरेदी करण्याची मागणी करत आहेत. मात्र, हे तुकडे एमएसआरडीसीच्याही कामाचे नाहीत. आम्हाला सरळ रेषेत जमीन लागते. ती आम्ही संपादित केलेली नाही. एमएसआरडीसीच्या प्राथमिक सर्वेक्षणात अशा तुकड्यांतील जमिनींचे मूल्य तब्बल 1400 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे समोर आले होते.'
- बापूसाहेब साळुंके, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी (औरंगाबाद विभाग)

तुकड्यांचं करायचं काय?
विकता येईना, कसता येईना
जांबरगावच्या (ता. वैजापूर) गणेश गवळींची गट क्रमांक 242 मधील 2 एकरपैकी 47 गुंठे जमीन समृद्धी महामार्गात गेली. दक्षिणेकडे 7, तर उत्तरेला 26 गुंठे उरले. दक्षिणेकडच्या तुकड्यात जाण्यासाठी त्यांना रस्ताच नाही. कारण महामार्ग ओलांडता येत नाही. दक्षिण बाजूच्या एखाद्या शेतकऱ्याला हा तुकडा विक्री करावा, तर त्याचे खरेदीखतही होत नाही. कारण, तुकडेबंदीनुसार 20 गुंठ्यांपेक्षा कमी जमीन खरेदी-विक्री होत नाही. ही जमीन कसताही येईना अन् विकताही येईना, अशी गत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...