आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारमजान महिन्याच्या निमित्ताने जुन्या औरंगाबाद शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. या काळात अत्तर, डोळ्यात सुरमा लावण्यास मोठे महत्त्व असते. त्यामुळे गुलमंडी, अत्तर गल्लीसह या परिसरातील ५० ते ६० दुकानांमध्ये विविध प्रकारच्या अत्तरांचा दरवळ आकर्षित करत आहे. तसेच विविध प्रकारचा सुरमा, सुरमेदानीचीही विक्री वाढली आहे. ३० रुपयांपासून ते ५ हजार रुपये दहा ग्रॅम (तोळ्यापर्यंत) अत्तराचे दर आहेत.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. मात्र, यंदा महामारीचे संकट टळले अन् बाजारपेठेतही चहलपहल वाढली. या काळात अबालवृद्धांच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तरांचा सुगंध बाजारात लक्ष वेधून घेत आहे. गुलमंडीतील अत्तर बाजार हा निजामकालीन आहे. या भागात अत्तर विक्रेत्यांची चौथी पिढी व्यवसाय करते. शहरातील जाणकार, अत्तरप्रेमी याच भागात येऊन दरवर्षी खरेदी करतात. या व्यतिरिक्त सिटी चौक, चंपा चौक, रोषण गेट या भागातही अत्तराची दुकाने आहेत. तसेच डाेळ्यात घालण्यासाठी सुरम्यालाही चांगली मागणी आहे. रमजानमध्ये सुमारे एक क्विंटल सुरमा विक्री होतो, असे विक्रेत्यांनी सांगितले. कन्नोज, रतलाम व मुंबई येथून हे अत्तर शहरात विक्रीसाठी येतात.
गुलमंडी, अत्तर बाजारसह शहरात ६० पेक्षा अधिक दुकाने थाटली, एक क्विंटल सुरम्याची विक्री होण्याचा अंदाज
अत्तराचे प्रकार व दर (प्रति १० ग्रॅम)
जन्नतुल फिरदौस, पॉयझन, मिलाप, रूहे गुलाब, मोगरा, महेफील-ए-दरबार- ३२० रुपये, शमामुल अंबर - ५२० रुपये, सफारी - २८० रुपये, रूहे खस - ६०० रुपये, हिना - ५२० रुपये
सुरेख सुरमेदानींचे आकर्षण
सुरमा ठेवण्यासाठी आकर्षक सुरमेदानी खरेदी करण्यावर ग्राहकांचा कल असतो. त्याचे दर ११० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. शंभराहून अधिक सुरेख प्रकारात सुरमेदान्या विक्रीसाठी आलेल्या आहेत, अशी माहिती अत्तर विक्रेते मुसद्दीक यांनी दिली.
सुरमा व सुरमेदानीचे दर : रमजानच्या महिन्यात डोळ्यात सुरमा लावण्यासही पसंती दिली जाते. खडेका सुरमा सर्वात उत्तम मानला जातो. तो खड्याच्या स्वरूपात येतो. अनेक जण तो घरी नेऊन दळतात तर काही जण रेडिमेड घेऊन जातात. चाळीस रुपयांत दहा ग्रॅम असा त्याचा दर असतो. तर मुमताज हा प्रकार ६० रुपयांत ३ ग्रॅम मिळतो. अरब राष्ट्रासह कोहेतूर येथून प्रामुख्याने सुरमा येतो.
वातावरणानुसार अत्तराचा वापर : मोहंमद जफर
अत्तर विक्रेता मोहंमद जफर म्हणाले, अत्तर लावणे परंपरेचा भाग आहे. कोणत्या ऋतू व वातावरणात कोणते अत्तर वापरायचा हे शौकिनांना चांगले माहीत असते. उन्हाळ्यात रूहे गुलाब, मोगरा, रूहे खस, डेनीम, सपारी हे प्रकार वापरले जातात. तर हिवाळ्यात हिना, शमामुल अंबर, महेफील-ए-दरबार, मुश्क सारख्या अत्तरांना मागणी असते. व्यापारी राजेंद्र सुगंध म्हणाले की, अत्तराचा सुगंध किती तास राहतो, त्यावरून त्याची गुणवत्ता ठरत असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.