आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीवाढीचे पत्रक:‘फ्रान्सिलियन’ने पालकांना विश्वासात न घेता वाढवले तब्बल 70 टक्के शुल्क

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स या शाळेने अचानक वार्षिक शुल्कात ७० टक्के वाढ केली. शनिवारी सकाळी मेळाव्यासाठी आलेल्या पालकांना ही माहिती मिळताच त्यांनी शाळेत चार तास ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ‘ही आमची प्रिंट मिस्टेक आहे’ असा दावा शाळेने केला. तरीही आम्हाला मुख्याध्यापकांची भेट घ्यायची आहे, असे म्हणत पालक अडून बसले. अखेर शाळा प्रशासनाने पोलिसांना बोलवले. नंतर फीवाढीचा निर्णय आम्ही मागे घेतला, असे स्पष्टीकरण शाळेने दिले.

सेव्हन हिल्स उड्डाणपूलाजवळ फ्रान्सिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स ही शाळा आहे. शनिवारी शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी शुल्कवाढीची नोटीस पालकांना देण्यात आली. ३१ हजारांचे शुल्क ५१ हजार केल्याचे पाहून पालक संतप्त झाले. शाळेने याचे योग्य स्पष्टीकरण दिले नाही. ‘आमचा वकील तुमच्याशी बोलेल’ असे अजब उत्तर काही पालकांना मिळाले. त्यानंतर पालक चिडले. फीवाढ मागे घ्या, अशी घोषणाबाजी सुरू झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे वाटल्याने शाळेने तत्काळ स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाळा आणि पालकांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही राजकीय पुढारीदेखील शाळेत आले होते. मात्र, पालक शुल्कवाढ रद्द झालीच पाहिजे, या मागणीवर ठाम होते.

शाळेचा मनमानी कारभार : शाळेचा मनमानी कारभार आहे. मुख्याध्यापक पालकांना भेटत नाहीत. त्यांच्या आडमुठ्या कारभाराविरोधात आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. - विजय भांडे, पालक

फीवाढ परवडणारी नाही : आधीच शाळेची फी जास्त आहे. त्यात ७० टक्क्यांपक्षा जास्त वाढ केली. ती पालकांना परवडणारी नाही. त्यामुळे आम्ही मुख्याध्यापकांना विनंती करण्यासाठी आलो होतो. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलन करावे लागले. - दीपाली मंत्री, पालक

आंदोलन सुरू होताच शाळेने सर्व गेट बंद केले स. ८.३० पासून पालक मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, ते भेटत नव्हते. पालकांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर शाळेचे सर्व गेट बंद करण्यात आले. त्यानंतर काही राजकीय नेते आले. परंतु शाळा प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम हाेते. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे सव्वाअकरा वाजता शाळेत आले. त्यांनी पालकांची समजूत घातली. त्यानंतर उपमुख्याध्यापिका सिस्टर मरिया व सिस्टर कांता यांनी दोन दिवसांत फीवाढीबद्दल निर्णय घेण्याचे तोंडी आश्वासन दिले. फीवाढीच्या नोटिसीमध्ये प्रिंट मिस्टेक झाल्याचे त्यांनी सांगितले.

१५ टक्के वाढीचा अधिकार मागील तीन वर्षांपासून शाळेने शुल्कवाढ केली नाही. नियमानुसार शाळेला १५ टक्के वाढीचा अधिकार आहे. मात्र आम्ही १० टक्केच शुल्कवाढ करणार आहोत. पालकांच्या हातात गेलेल्या पत्रकात प्रिंट मिस्टेक झाली होती. - सॅड्रिक फर्नांडिस, डिसिप्लिनरी मॅनेजमेंट कमिटी सदस्य, फ्रान्सिलियन स्कूल.

शाळेने सुचवलेले साहित्य दुकानातून घ्यावे लागते शालेय साहित्य, गणवेश शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करावे लागते. आता शाळेने दरवेळी अवाजवी फी वाढवणे बंद करावे. - रवींद्र पाटील, पालक

बातम्या आणखी आहेत...