आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र देण्याचे आमिष दाखवून पावणेदोन लाख रुपयाला गंडवणाऱ्या बाहेर राज्यातील दोघांवर बासंबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी संबंधित खाते क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे संतोष उत्तमराव कपाळे हे गावात आपले सरकार सेवा केंद्र चालवतात. काही दिवसांपूर्वीच भ्रमणध्वनीवर अभिषेक व मनोज कुमार सक्सेना या दोघांनी संपर्क साधला. तुम्हाला एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र मिळून घेतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांना वेळोवेळी ऑनलाईन पैसे देखील जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कपाळे यांनी पहिल्या टप्यात १ लाख रुपये जमा केले. सदर रक्कम जमा झाल्यानंतर त्या दोघांनी कपाळे यांना रिझर्व बँकेचा शिक्का असलेले एक पत्र मेलवर पाठवले. त्यानंतर आणखी ७० हजार रुपये जमा करण्याची सांगितले.
दरम्यान ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाल्याचे समजून कपाळे यांनी आणखी ७०हजार रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली. मात्र त्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मंगळवार ७ बासंबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अभिषेक व मनोजकुमार सक्सेना या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरिक्षक एस. बी. भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार यांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी आज या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत त्यांनी ज्या बँक खात्यात पैसे जमा केले त्याबँक खात्याचे सर्व डिटेल्स व खाते क्रमांक कोणाच्या नावे आहे याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या खाते क्रमांकावरून आता पोलिसांनी आरोपींचा शोध चालवला आहे. सदर व्यक्ती कोलकत्ता येथील असाव्यात अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.