आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:नोकरीचे अमिष दाखवून 9 राज्यातील तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली हेरली तरुणाई

महाराष्ट्रासह ९ राज्यांमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून हजारो तरुणांची करोडो रुपयांची पसवणुक केल्या प्रकरणी सात जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा व वसमत पोलिसांच्या संयुक्त पथकाने नांदेड, लखनऊ, दिल्ली, मुंबई, ओडिसा येथून अटक केली आहे. त्यांनी महाराष्ट्रासह ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्‍चिम बंगाल या नऊ राज्यासह इतर राज्यातील हजारो तरूणांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंडीत सुधाकर ढवळे यास रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून उत्तरप्रदेशातील बोडेपूर येथील संतोष सरोज याने १० लाख रुपये घेतले. मात्र त्यास नियुक्तीचे बनावट कागदपत्रे दिली. या प्रकरणी ढवळे यांच्या तक्रारीवरून ता. १३ मे रोजी वसमत शहर पोलिस ठाण्यात संतोष बनवारीलाल सरोज याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.

त्यावरून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापन केली होती.

यामध्ये गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, वामन पवार, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे यांच्यासह यांच्या पथकाने मागील पंधरा दिवसांपासून आरोपींची धरपकड मोहिम सुरु केली होती.

यामध्ये पोलिसांनी रवींद्र उर्फ राबिंद्र दयानिधी संकुवा (रा. ओडीसा, ह. मु. ठाणे), ॲड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (रा. लयरोपरूवार उत्तरप्रदेश), सतीष तुळशीराम हंकारे (रा. बोरगाव जि. नांदेड), आनंद पांडूरंग कांबळे (रा. अहमदपुर जि. लातुर), गौतम एकनाथ फसणे (रा. वाघणी जि. ठाणे), अभय मेघराम रेडकर उर्फ राणे (रा. मोतीनगर दिल्ली), संतोषकुमार सरोज (रा. बोडेपूर उत्तरप्रदेश) यांना विविध ठिकाणावरून अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केलीअसता त्यांनी नऊ राज्यात हजारो तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक केल्याचे कबुल केले. या प्रकरणात पोलिसांनी वरील सात जणांचे विविध बँकांचे १८ बँक खाते सिल केले असून त्यातील ११ लाख रुपयांची रक्कम सेझ केली आहे. या शिवाय सात मोबाईल, एक कार देखील जप्त केली आहे.

या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण भारतात असून अटक करण्यात आलेल्या सात जणांच्या अधिक चौकशीमध्ये आणखी आरोपी हाती लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१० वर्षापासून सुरु होता गोरख धंदा

या सात जणांकडून मागील दहा वर्षापासून तरुणांच्या फसवणुकीचा गोरखधंदा सुरु होता. त्यापैकी बहुतांश जणांनी तरुणांच्या फसवणुकीतून मिळालेली रक्कम अय्याशीमध्ये उडविल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून विविध राज्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नांवे असलेले बनावट शिक्के, रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावे बनावट नियुक्तीपत्रे, रेेल्वेचे ओळखपत्र, बनावट नियुक्तीपत्रे, एटीएम कार्ड जप्त केले आहे.

पोलिस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली हेरली तरुणाई

नांदेड येथे पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमी सुरु करून त्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नोकरीचे अमिष दाखविले. त्यानंतर तरुणाईला नोकरीच्या अमिषाने हेरून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम घेऊन त्यांना विविध विभागाचे बनावट नियुक्त पत्र दिल्याचेही पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...