आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष:सिडकोच्या संभाजी कॉलनीत ड्रेनेजलाइन वारंवार चोकअप; पिण्याचे पाणीही गढूळ

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-६ संभाजी कॉलनीतील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे स्वच्छ पाणी, वारंवार ड्रेनेजलाइन चोकअप होते, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्याने वाहते. तसेच काही वर्षांपूर्वी व्यायामशाळा अचानक बंद पडल्याने तेथे कचराकुंडी तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मालमत्ता, पाणीपट्टी कर भरूनही समस्यांचा निपटारा होत नसल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महापालिका प्रशासन मात्र लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या भागातील नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होतो. तसेच कायम ड्रेनेजलाइची समस्या भेडसावते. या मूलभूत समस्यांवर मनपाने लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशी अनिल शेजवळ यांनी केली.

डास अन‌् दुर्गंधी मोठ्या प्रमाणात
२०१२ मध्ये व्यायामशाळा सुरू झाली होती. परंतु, ती दोन महिन्यांनंतर बंद पडली. आज तेथे लोक कचरा टाकतात. या परिसरात डास आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
-सुधीरकुमार वाघ, रहिवासी

मनपाने औषध फवारणी करावी
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे समस्यांकडे मनपाने लक्ष देऊन औषध फवारणी करावी.
-कपिल जाधव, रहिवासी

चेंबर व्यवस्थित साफ करावे
वारंवार ड्रेनेज चोकअप होऊन घाण पाणी रस्त्यावर येते. मनपा कर्मचारी व्यवस्थित चेंबर साफ करत नाहीत. त्यामुळे ही समस्या वारंवार निर्माण होत आहे.
-दिलीप पट्टेकर, रहिवासी

ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा
सिडकोच्या एन-६ ई-सेक्टर परिसरात वारंवार ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा होतो. याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाकडे तोंडी व लेखी निवेदन दिले. परंतु, समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे नागरिकांना फिल्टरचे पाणी विकत घ्यावे लागत असून विनाकारण आर्थिक भुर्दंड बसतो.
-संदीप बोर्डे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...