आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज्युकेशन एक्स्पो:कॉस्मेटिक्सपासून कॅलिग्राफीपर्यंत.. स्वावलंबनाचा प्रवास ; 25 मुस्लिम महिलांनी लावले विविध स्टॉल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीची मळलेली वाट नाकारून उद्योग उभ्या करणाऱ्या मारिया खान, दिल्लीत हनी बुक्स नावाने स्वत:चा पब्लिकेशनचा व्यवसाय चालवणाऱ्या नजमा परवीन यांच्यासारख्या अनेक जणी केवळ त्यांची उत्पादनेच विकत नव्हत्या तर शेकडो मुस्लिम महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमतेची प्रेरणाही देत होत्या. निमित्त आहे, आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एज्युकेशन एक्स्पोचे. २२ डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात महिलांचे शिक्षण, प्रशिक्षण व उद्योजकता विकास असे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथे नेहमीच्या पापड, लोणच्यांच्या पलीकडे सुगंधी बाम, उटणे, वॅक्स, परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने निर्मितीसह कॅलिग्राफी, पोर्ट्रेट, पुस्तक प्रकाशन अशा उद्योगांच्या वेगळ्या वाटा निवडलेल्या महिलाही सहभागी झाल्या आहेत.

उर्दूतून पीएचडी करणाऱ्या जरीन खान यांनी तरुणींना स्वयंरोजगार करता येईल यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती देणारा स्टॉल या ठिकाणी लावला आहे. शहरातील उर्दू वाचकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन स्वत:चे पब्लिकेशन हाऊस सुरू करणाऱ्या व खास दिल्लीहून आलेल्या नजमा परवीन यात सहभागी झाल्या आहेत. कॅलिग्राफीसारख्या कलेतून पोर्ट्रेट तयार करून ऑनलाइन विक्री करणाऱ्या सय्यदा समारा इरम त्यांचाही इथे स्टॉल आहे. त्यामुळे या प्रदर्शनास भेट देणाऱ्या महिला व तरुणींना येथील उत्पादनांसोबत त्यांच्या निर्मात्यांशी संवाद साधण्याची, त्यांचे अनुभव व कौशल्य जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

नोकरीऐवजी स्वतःचे ५० प्रॉडक्ट बनवून विक्री मी बीएस्सी मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर नोकरीऐवजी महिलांसाठी हर्बल सौंदर्य प्रसाधने तयार केली. यात सुगंधी बाम, वॅक्स, हेअर ऑइल, फेशियल, सोप, परफ्यूम आदी ५० प्रॉडक्ट तयार करून ऑनलाइन व ऑफलाइन विक्री सुरू केली आहे. - खान मारिया

इंग्रजी व उर्दूतील पोर्ट्रेटची ऑनलाइन विक्री सुरू केली मी एमएस्सी केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर माझा छंद कॅलिग्राफी असल्यामुळे त्यात अरबी, इंग्रजी व उर्दू मधून कॅलिग्राफीचे पोर्ट्रेट तयार करते. घरूनच व्यवसाय सुरू केला आहे. सध्या इन्स्टाग्राम तसेच ॲमेझॉनसारख्या साइटवर विक्री करत आहे.-सय्यदा समारा इरम

हॉबी क्लासमधून मुलींना प्रशिक्षण दिले मी सध्या उर्दू मधून पीएचडी करत आहे. स्वतःची इन्स्टिट्यूट सुरू करून मुलींना स्वयंरोजगार देण्यासह त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करून त्यांच्यासह स्वतःलाही रोजगार उपलब्ध करून घेतला आहे. - जरीन खान

औरंगाबाद शहरात चांगला प्रतिसाद दिल्लीमध्ये माझे हनी बुक्स हे पब्लिकेशन हाऊस आहे. मी उर्दूतून सामान्यज्ञान, विज्ञानची पुस्तके प्रकाशित करते. अन्य शहरांपेक्षा औरंगाबादमध्ये प्रतिसाद चांगला मिळत आहे. - नजमा परवीन

बातम्या आणखी आहेत...