आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समितीची सोमवारी बैठक:G-20 : फेब्रुवारी, मेमध्ये 20 देशांचे 500 उच्चपदस्थ औरंगाबादेत येणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ‘जी-२०’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे काही कार्यक्रम मुंबई, पुणे व औरंगाबादेत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाला तयारीच्या सूचनाही मुख्य सचिवांकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक व पर्यटननगरी असलेल्या या शहराची बलस्थानी असणारी पुस्तिका तयार केली जात आहे. तसेच शहरातील विविध स्थळांचे सौंदर्यीकरण व प्रमुख रस्ते चकाचक केले जाणार आहेत. या तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्वच विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

भारतात प्रथमच होत असलेल्या या परिषदेत २० देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सचिव इतर उच्चस्तरीय अधिकारी येणार आहेत. देशातील ३० ते ४० शहरांत त्यांच्या २०० ते २५० बैठका होणार आहेत. वेरूळ व अजिंठा लेणी ही दोन जागतिक वारसास्थळे असलेल्या औरंगाबादचाही या शहरांत समावेश आहे. या विदेशी शिष्टमंडळासमोर औरंगाबादची ब्रँडिंग करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी व मे अशा दोन महिन्यांत ‘जी-२०’ परिषदेचे सदस्य औरंगाबादेत येण्याची शक्यता आहे. एका वेळी २५० अशा तब्बल ५०० व्हीआयपी व्यक्तींचा शहरात दोन दिवस मुक्काम असेल. ताज, रामा इंटरनॅशनल, अॅम्बेसेडर अजिंठा, लेमन ट्री अशा पंचतारांकित हॉटेलात त्यांची निवासव्यवस्था करण्यात येईल.

शहराचे ब्रँडिंग करणार
शहरातील प्रसिद्ध उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, ऑरिक सिटीतील शेंद्रा-बिडकीन या उद्योगनगरीत विदेशातील उद्योग येण्यासाठी जी-२० ही परिषद फायदेशीर ठरणार आहे. औरंगाबादेतील उद्योजकही या परिषदेतील चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे भविष्यात गुंतवणूक आणण्यासाठी या बैठका फलदायी ठरतील. औरंगाबादचे ब्रँ़डिंग विदेशातील उच्चपदस्थ शिष्टमंडळासमोर केले जाणार आहे. यात शहर व मराठवाड्याची बलस्थाने व ऐतिहासिक स्थळांची विशेष पुस्तिका इंग्रजीतून काढण्यात येणार आहे. साधारण ५० पानांच्या या पुस्तिकेत नकाशांचाही समावेश असेल. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आणि उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यावर पुस्तिकेची जबाबदारी असेल.

या अधिकाऱ्यांची घेणार बैठक
सोमवारी विभागीय आयुक्त हे प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतील. यात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक, रेल्वेचे प्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल, विद्यापीठ, घाटी, आरटीओ, ऑरिक सिटी, बांधकाम विभाग, विमानतळ प्राधिकरण रस्ते विकास महामंडळ, व्यवस्थापक एमटीडीसी, एमआयडीसी, पर्यटन विभागाचे प्रमुख अधिकारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...