आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक:G-2० पाहुण्यांना पायघड्या A-20 यजमान उपेक्षित का?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत फेब्रुवारीच्या अखेरीस जी-२० परिषदेची बैठक होत आहे. यासाठी २० राष्ट्रांतील सचिव दर्जाचे अधिकारी व विदेशी पाहुणे येतील. आपल्या ऐतिहासिक शहराला प्रथमच हा बहुमान मिळाल्याचा आनंद आहेच. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या स्वागतासाठी अंग झटकून कामाला लागलीय. सरकारनेही ५० कोटी रुपये शहर सुशोभीकरणासाठी दिलेत. या निधीतून प्रमुख चौक, रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झालीत. उड्डाणपुलाखाली उकिरड्यात उभ्या भिंतीही रंगरंगोटी केल्यामुळे बोलक्या झाल्यात. प्रमुख रस्त्यांवर डांबरीकरणाचा ‘मुलामा’ चढवला जातोय. सुमारे २५ ते ३० वर्षांपासून नागरी समस्यांनी त्रस्त असलेले २० लाख औरंगाबादकर मात्र हा ‘सरकारी चमत्कार’ पाहून सुखावलेत. साधे खड्डे बुजवण्याच्या, नियमित कचरा गोळा करण्याच्या मागणीसाठी थेट मनपा, आयुक्तालयावर मोर्चा काढण्याची वेळ आणणारे प्रशासन अचानक इतके ‘तत्पर’ कसे झाले? या प्रश्नाचे उत्तर येथील सामान्य जनता शोधतेय.

जायकवाडीसारखे धरण उशाशी असलेले हे शहर २५ ते ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दंगलीचे चटके याच नगराने सोसलेत. हाडं खिळखिळी करणाऱ्या खड्ड्यांशी येथील वाहनचालकांनी वर्षानुवर्षे तडजोड केलीय. आजही विस्तारित शहरातील अनेक वसाहती-कॉलन्या पाणी, रस्ते, पथदिवे या मूलभूत समस्यांशी झगडत आहेत. मात्र तिकडे लक्ष देण्यास ना नेत्यांना वेळ आहे ना अधिकाऱ्यांना. पण याच शहरात अचानक सौंदर्यीकरणाचे वारे वाहू लागल्याने सारे अचंबित आहेत.

चार दिवसांसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी घर नीटनेटके करावेच लागते यात शंका नाही. हीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे या कामांचे कौतुकच आहे. पण २५ वर्षांपासून येथील समस्यांच्या छळछावण्यात राहणाऱ्यांचे प्रश्न इतके दिवस प्रशासनाला दिसले नाहीत का? हा २० लाख औरंगाबादकरांचा सरकारला प्रश्न आहे. बरे, विदेशी पाहुणे हवाईमार्गे येतील, महामार्गाने भर्रकन निघूनही जातील. ५० कोटींचे सौंदर्य कितपत त्यांच्या नजरेस पडेल हे देवच जाणो. आम्हाला तर रोजच गल्लोगल्लीतून नाकाला रुमाल लावून वाट काढावी लागतेय. बरं, आम्हीच मते देऊन वर्षानुवर्षे तुम्हाला सत्तेत बसवतोय. आता पाहुण्यांच्या सरबराईत तुम्ही व्यग्र असाल, पण त्यानंतर तरी आमच्या समस्या दूर करण्याची सुबुद्धी तुम्हाला येईल का? हा २० लाख रहिवाशांचा प्रश्न आहे.

प्रणव गोळवेलकर, राज्य संपादक, महाराष्ट्र

बातम्या आणखी आहेत...