आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक अधिकाऱ्यांची खेळी:गडकरींनी महिनाभरापूर्वी भूमिपूजन केलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण रद्द, भूसंपादनातील संभाव्य घोटाळे समोर येण्‍याची भीती

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ वर्षांपासून चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला आणि खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दोन वेळा भूमिपूजन केलेल्या औरंगाबाद ते पैठण रस्त्याचे चौपदरीकरण एनएचएआयने रद्द केले आहे. या रस्त्याचा डीपीआर तयार झाला, भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी हे कामच रद्द करण्याचा डाव एनएचएआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आखल्याचे बोलले जात आहे. कारण या रस्त्यावर गेवराई तांडा गावात जिथे बायपास होणार होता, तिथे औरंगाबादमधील काही बिल्डर, काँट्रॅक्टर, राजकारणी आणि उद्योजकांनी या भागात जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. ही बाब “दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर बायपास रद्द करण्याऐवजी एनएचएआयने पूर्ण रस्ताच रद्द करण्याची खेळी केली.

तीर्थक्षेत्र पैठणला जाण्यासाठी चौपदरी रस्ता करण्याची मागणी मागील १५ वर्षांपासूनची आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता होता. २०१२ मध्ये या विभागाने रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूमिपूजन केले होते.

मात्र, ते बारगळले. त्यानंतर २०१६ मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा करून भूमिपूजनही केले होते. परंतु, त्यावेळी हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितच होता. तरीही गडकरींनी हवेतच घोषणा केली. २०१८ मध्ये हा रस्ता अधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम विभागाने एनएचएआयकडे हस्तांतरित केला. त्यानंतर एनएचएआयने डीपीआरसाठी तीन वर्ष घातल्यानंतर २४ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा मंत्री गडकरींनी औरंगाबादमध्ये येऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन केले. यासाठी दीड हजार कोटी मंजूर असल्याचेही जाहीर केले होते.

दरम्यान, या रस्त्याचा डीपीआर बनवणे सुरू असताना गेवराई तांडा या छोट्याशा गावाला बायपास प्रस्तावित केला. हा बायपास ज्या ठिकाणाहून प्रस्तावित केला होता त्या गटांमध्ये बिल्डर, उद्योजक, राजकारणी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर मंडळींच्या जमिनी होत्या. विशेष म्हणजे यातील काही जमिनी या रस्त्याचे थ्री-ए नोटिफिकेशन निघण्याच्या केवळ १५ दिवस आधी खरेदी केल्या होत्या. म्हणजे एनएचएआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा मार्ग आधीच ‘लिक’ केल्याचे यातून स्पष्ट होते. या बायपासला गेवराई तांडा ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन रस्ता गावातूनच करा, अशी मागणी केली होती. हा सर्व प्रकार दिव्य मराठीने उघडकीस आणला होता. उघडे पडू नये, म्हणूनच रस्ता रद्द?

या रस्त्यावर गेवराई तांडा गावात जिथून बायपास जाणार तिथे धनदांडग्यांनी आधीच जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. अधिकारी आणि धनदांडग्यांची ती मिलीभगत दिव्य मराठीने उघडकीस आणल्यानंतर भेदरलेल्या अधिकाऱ्यांनी तो बायपास रद्द करण्याऐवजी अख्खा रस्ताच रद्द केला आहे. आता केवळ आहे त्याच रस्त्यावर दोनपदरी डांबरीकरण करण्याचे काम एनएचएआय करणार आहे. पैठण रोडच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन खुद्द नितीन गडकरी यांनी दोनवेळा केले.

पैठणकरांच्या नशिबी खड्डेच
राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघ. पाच वर्षे वगळता मागील सलग पाच वेळा ते या मतदारसंघातून आमदार झाले. आता ते मंत्री आहेत. तरीही त्यांच्या मतदारसंघातला मुख्य रस्ता अशा खस्ता खातोय. या रस्त्याच्या भूमिपूजनात भुमरेंनी मोठे भाषण करून गडकरींचे आभारही मानले होते. मात्र, आता हा रस्ताच रद्द झाल्यानंतर भुमरेंनी अद्याप ब्र शब्दही उच्चारला नाही. पैठणकरांच्या नशिबी दोनपदरी रस्त्यावरील खड्डेच यापुढेही कायम राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...