आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जन्मात माफ करा, तुमचे ऋण पुढच्या जन्मी फेडेन..!:मैत्रिणीला पेटवणाऱ्या गजाननचे खोलीतील बोर्डावर आई-वडिलांना उद्देशून पत्र

प्रतिनिधी |औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रिणीकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मानसिक तणावाखाली गेलेल्या गजानन खुशाल मुंडे (३०, रा. दाभा, ता. जिंतूर ) या पीएचडीची तयारी करणाऱ्या संशोधकाने स्वत:सह मैत्रीण पूजा कडुबा साळवे (२८, रा. दहेगाव, ता. सिल्लोड ) हिला पेटवले होते. सोमवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेत ९० टक्के भाजलेल्या गजाननचा मृत्यू झाला, तर ४० टक्के गंभीर भाजलेल्या पूजावर घाटीत उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी गजाननची विद्यापीठ होस्टेलमधील खोली उघडली असता त्याने तेथील पांढऱ्या बोर्डवर आई-वडिलांना उद्देशून भावनिक मजकूर लिहिल्याचे आढळून आले. यापूर्वी तीन वेळा आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केलेल्या गजाननने सोमवारी पूजालाही संपवण्याचा निर्धार केला होता. त्याने दोन बाटल्यातील पेट्रोल दोघांच्या अंगावर ओतून घेतले, पण त्याच्या बॅगमध्ये अजून पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या, वायरचे बंडल व चाकू, काडीपेटी, लायटर आढळून आले. याचा अर्थ एक प्लॅन फसला तर दुसऱ्या मार्गाने पूजाला संपवण्याचा कट त्याने रचला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली.

गजानन विद्यापीठात प्राणिशास्त्र विषयात पीएचडी करत होता, तर पूजा बायोफिजिक्स विषयात पीएचडी करत होती. गेल्या चार वर्षांपासून दोघांत मैत्री होती. पूजाच्या आरोपांनुसार, काही महिन्यांपासून गजाननने एकतर्फी प्रेमाचा हट्ट सुरू केला. सतत भेटण्यासाठी प्रयत्न करणे, पाठलाग करणे सुरू केले. पूजाने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रारी केल्या. तरीही १५ दिवसांपासून गजानन पूजाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात होता. सोमवारी पूजा हनुमान टेकडी परिसरातील शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गेल्याचे गजाननला कळले. त्याने तिकडे जाऊन तिच्यासह स्वत:ला पेटवून घेतले.

‘सत्य जिंकले पाहिजे, अन्यथा मुक्या यंत्रणेचा धिक्कार’
मृत्यूपूर्वी गजाननने बोर्डवर आई-वडिलांसाठी भावनिक मजकूर लिहिला. सुरुवातीला ओम लिहून नऊ ओळी लिहिल्या. ‘मला ब्लॅकमेल करून फसवलं. फूस लावली. लग्न करण्यास भाग पाडून अडीच लाख रुपये घेतले. तिच्या टॉर्चरमुळे मी ३ वेळेस सुसाइडचा प्रयत्न केला. त्यांनी मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पुढच्या जन्मात तुमचे ऋण फेडेन. मला माफ करा. माझ्या चारित्र्यात खोट नाहीये. सत्य जिंकलेच पाहिजे, नसता या मुक्या यंत्रणेचा धिक्कार असेल,’ असे त्याने लिहून ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...