आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात गणेशाेत्सव:कराचीतील जिन्ना मार्गावर ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, मराठी आरत्या, गाण्यांद्वारे गणरायाला वंदन

औरंगाबाद (नितीन पाेटलाशेरू)5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्सव मंडपात मराठी गाण्यांची धूम, दीड दिवसाच्या गणेशोत्सवात भाविकांना मिळते वर्षभराची ऊर्जा

महादेवाच्या मंदिरातील माेठे मंडप, एका कोपऱ्यात मोठ्याने शंखनाद करणारा भाविक, लाल चुडा भरलेल्या व कपाळावर कुंकू असलेल्या पारंपरिक वेशातील महिला हातात निरंजनाचे तबक घेऊन “जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती...’ ही आरती म्हणत असतील तर त्यात वेगळे काय, असा प्रश्न कुणालाही पडेल. पण ते चित्र पाकिस्तानातील आहे, असे म्हटले तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. एक-दोन वर्षांपासून नव्हे तर पाकिस्तानच्या निर्मितीपासून कराचीमध्ये मूळ मराठी कुटुंबीयांकडून अगदी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही तेथे असाच उत्साह दिसला.

फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या कृष्णा नाईक यांनी या उत्सवाची सुरुवात केली. आता त्यांचे चिरंजीव राजेश नाईक व त्यांची पुढची पिढी ही परंपरा पुढे चालवत आहेत. नाईक कुटुंबीय मूळचे कोकणातील आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाबद्दल त्यांच्या मनात पूर्वीपासूनच आस्था. त्यांनी कराचीतील अनेक मराठी कुटुंबांना या उत्सवात जोडले. विशेष म्हणजे तेथे श्री महाराष्ट्रीयन पंचायतची स्थापना केली गेली. या माध्यमातून मराठी तसेच भारतीय सण, उत्सव साजरे केले जातात.

उत्सव मंडपात मराठी गाण्यांची धूम

गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण दीड दिवस येथे भजन, कीर्तन, गणरायाला वंदन करणारी गाणी वाजवली जातात. गणपतीच्या आरत्याही मराठीतच म्हटल्या जातात. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या दिवशी रात्रभर जागरण केले जाते. गरबा रासचेही आयोजन असते. मोठ्या साउंड बॉक्सवर मराठी गाण्यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उत्साह भरला जातो. गणरायाची वाजवली जाणारी बहुतांशी गाणी ही मराठीच असतात.

महादेव अन् गणेश मंदिरात जागरण, भजन

दरवर्षी नाईक कुटंुबीयांकडून मातीच्या गणेशमूर्ती साकारण्यात येतात. त्यांच्याकडून अनेक मराठी कुटुंबांना या मूर्ती दिल्या जातात. कराचीतील रत्नेश्वर महादेव मंदिर, गणेश मठ मंदिर आणि स्वामीनारायण मंदिरात मोठा उत्सव असतो. गणपती येथे दीड दिवसाचा असला तरी या उत्सवातून वर्षभराची ऊर्जा मिळत असल्याची भावना भाविक लीला प्रकाश, जया जाधव, प्राण सुरेश नाईक यांनी व्यक्त केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser