आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूलची यात्रा:दीड हजार लोकांना खिळवून ठेवत गणू, शंभू, सोनूने पटकावले बक्षीस; अश्वांचे नृत्य, बाइक रेसिंगच्या थराराने जिंकली मने

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमद्या घोड्यांचे चित्तथरारक नृत्य, १ क्विंटल वजनाचा हैदराबादी बोकड यासह एडके, हेला अशा प्राण्यांनी हर्सुल येथील हरसिद्धी माता यात्रेचा दुसरा दिवस गाजवला. जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या घोड्यांच्या नृत्याने दीड हजार प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले होते. इगतपुरीचा घोडा गणू, घोटीचा सोनू अन‌् पैठणच्या शंभुने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. बेगमपुऱ्याच्या काजलला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

माजी नगरसेवक पूनम बमणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोड्यांचा नाच झाला. लाल मातीवर घोड्यांचा नाच, घोड्यांची पळण्याची स्पर्धा आणि बाइक रेसिंगचा थरार पाहता आला. बेगमपुऱ्यातील इरफान खान गफार खान यांच्या काजल घोडीने दुपारी १ वाजता नृत्याची सुरुवात केली. दोन पायांवर संपूर्ण रिंगणात फेरा पूर्ण करताच प्रेक्षकांनी जल्लोष केला. नाशिकच्या धनराज घोर यांच्या ‘मोती’ने परातीमध्ये पाय ठेवून केलेले नृत्यही नजर खिळवणारे होते.

चौकोनी पाट्यावर चारही पाय ठेवून त्यावर मुलाने उभे राहत केलेली कसरत काळजाचा ठेका चुकवणारी होती. पैठणच्या भाऊसाहेब रावस यांच्या शंभू घोड्याने मान हलवत, कान हलवणे, चार पायावर ठुमक ठुमक घुंगराचा व हलगीच्या आवाजावर उत्कृष्ट नाच केला.

या प्राण्यांकडे सर्वांच्या नजरा
यात्रेत चार शिंगाचे एडके, हेला, बोकडे असे विविध प्राणी बघायला मिळाले. यात हर्सूल येथील रहेमद नाईक यांची हैदराबादी गुलाबी जातीचा बकरा लक्षवेधक ठरला. ५ लाख रुपये किमतीचा १ क्विंटल वजनाचा बकरा रोज अर्धा किलो पेंडखजूर खातो.

नाचकाम, प्रदर्शन आणि चाल स्पर्धेतील विजेते मालक
घोड्याच्या नाचाच्या स्पर्धेत इगतपुरीचा धनराज भोर यांचा गणु प्रथम आला. घाेटीच्या उमेश विष्णू मालूजकर यांच्या सोनू घोड्याने द्वितीय पारितोषिक पटकावले. पैठणच्या भाऊसाहेब रावस यांच्या शंभू घोड्याने तृतीय तर बेगमपुऱ्यातील इरफान खान यांच्या काजलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अनुक्रमे २१ हजार, ११ आणि ७ हजार रुपयांचे बक्षीस मिळवलेे. सर्वांचेच नृत्य चित्ताकर्षक होते. भाविकांच्या जल्लोषाने हा कार्यक्रम रंगला.

बातम्या आणखी आहेत...