आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरांप्रमाणे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या प्रगतीसाठी बँकेच्या योजना नाहीत का, बँकांच्या विविध कर्ज प्रकरणांमध्ये दलालांचा वाढलेला सुळसुळाट रोखण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कुठले प्रयत्न केले जातात, असा सवाल विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी वैष्णवी मुळे हिने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर उपस्थित केला. ‘एसबीआय’तर्फे पंतप्रधान स्वनिधी आर्थिक समावेशन वित्तसाह्य अभियानांतर्गत ‘एमजीएम’मध्ये लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई विभागाच्या कार्यकारी व्यवस्थापक मेरी सगाया धनपाल, स्टेट बँक ऑफ इंडियाचे छत्रपती संभाजीनगरचे उपमहाव्यवस्थापक रविकुमार वर्मा, जिल्हा अग्रणी बँकेचे मंगेश केदार, महापालिकेचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांसह मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थींची उपस्थिती होती.
मेळावा संपल्यानंतर विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी वैष्णवी मुळे हिने व्यासपीठावर जाऊन बँकेचे अधिकारी व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांना प्रश्न विचारले. ‘सर्व कार्यक्रम शहरात होतात आणि सर्व कर्जाचा लाभ हा शहरी महिलांना होत असेल तर ग्रामीण महिलांच्या विकासासाठी शासन काय करते,’ असा प्रश्न तिने विचारला. ‘संबंधित कर्जाच्या योजनांमागे सर्वत्र दलालांचा सुळसुळाट असून अशा दलालांना रोखण्यासाठी बँक काय उपाययोजना करते? कर्ज प्रकरण मंजूर झाल्यावर अनेक महिलांकडून ५० टक्के रक्कम संबंधित दलाल ठेवून घेतात.
असे प्रकार रोखण्यासाठी शासन अथवा बँक कुठल्या उपाययोजना करते,’ असाही प्रश्न तिने उपस्थित केला. एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी रविकुमार, मेरी सगाया व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उत्तरे दिली. ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या योजना डॉ. कराड यांनी सांगितल्या. महिलांच्या बचत गटांना विशेष करून लाभ दिला जात असल्याची आकडेवारी त्यांनी वाचून दाखवली. बँकेमध्ये येणाऱ्या महिलांची कर्ज प्रकरणे ही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने मंजूर केली जातात. दलालांना येथे थारा दिला जात नाही. महिलांनी अधिकाऱ्याला भेटूनच कर्ज प्रकरणे पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
लाभार्थींना डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले. नियमित परतफेड केल्यास आणखी कर्ज मुंबईत केवळ ९ हजार महिलांनाच योजनेचा लाभ देण्यात आला होता. आम्ही मेळावे घेऊन दीड लाख महिलांना ‘पीएम स्वनिधी’चा लाभ मिळवून दिला. छत्रपती संभाजीनगरमध्येही १४, ७४० उद्दिष्टांच्या तुलनेत २९, ५५१ महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला. सुरुवातीला १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याची नियमित परतफेड केल्यास आणखी कर्ज दिले जाते. त्यामुळे ज्या उद्दिष्टांसाठी कर्ज घेतले त्यावरच ते खर्च करावे, असे यांनी डाॅ. कराड आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.