आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतिपाठ वाचन करून शुभारंभ:भाजपच्या सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ; 9 रथांमधून जीवनदर्शन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ समर्थनगर येथील सावरकरांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. नऊ रथांमधून सावरकरांचे जीवनचरित्र दाखवत यात्रेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात रविवारी (२ एप्रिल) झाली. गौरव यात्रेच्या कार्यक्रमस्थळी लागलेल्या महाविकास आघाडीच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र नसल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले, बाळासाहेब आपल्याकडे असल्यामुळे महाविकास आघाडीने त्यांचे छायाचित्र बॅनरवरून काढले अाहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा उल्लेख माफीवीर केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने सावरकर गौरव यात्रा काढली अाहे. यात्रेत नऊ रथांमधून सावरकरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. नेत्यांची भाषणे दाखवली जात आहेत. एलईडी व्हॅनचा यात समावेश आहे. सायंकाळी ६ वाजता यात्रेचा शुभारंभ शांतिपाठ वाचन करून करण्यात आला. सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर नेत्यांची भाषणे झाली.

सावरकरांबद्दल गैरशब्द खपवून घेणार नाही : डॉ. कराड म्हणाले, राहुल गांधी यांनी विदेशात देशाची बदनामी केली. भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत इतर देशांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. सावरकरांबद्दल गैरशब्द यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केले.

यात्रेचे मार्ग असे : यात्रा ३ एप्रिल रोजी रेणुकामाता मंदिर, सिडको ते टीव्ही सेंटर चौकापर्यंत काढण्यात येईल. ४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जयभवानीनगर ते कॅनॉट सिडको, ५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक चौक सिडको ते गजानन महाराज मंदिर, ७ एप्रिलला सातारा परिसरात, ८ एप्रिल रोजी क्रांती चौक व तेथून अहिल्यादेवी चौकात यात्रेचा समारोप होईल.

सावरकर गौरव रॅली काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : खासदार इम्तियाज सावरकरांचा गौरव करण्यासाठी रॅली काढणारे आणखी एक कट रचण्यासाठी आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर पूर्वपदावर आलेली शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अनमोल मानवी जिवापेक्षा घाणेरडे राजकारण महत्त्वाचे वाटते, असा अाराेप खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला अाहे. महाविकास आघाडीने २ एप्रिलला शहरात जाहीर सभेची घोषणा केली. त्याच दिवशी पोलिस दुसऱ्या रॅलीला परवानगी कशी देऊ शकतात, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अाता कोणताही अनुचित प्रकार घडला तर सर्व दोष या टोळीच्या माथी मारायला हवा.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीची कुबडी घेतली मंत्री सावे म्हणाले, काँग्रेससोबत जायची वेळ आली तर दुकान बंद करेल, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्रानेच काँग्रेससाेबत सलगी केली. उद्धव ठाकरे एकटे सभा घेऊ शकत नसल्याने त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची कुबडी घेतली. आ. बागडे यांनी राहुल गांधी यांना देश, धर्म, संस्कृतीबद्दल आस्था नसल्याचे सांगितले. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी राहुल गांधींचा उल्लेख राजीव गांधी असा केला. सभेतील प्रेक्षकांनी सांगितल्यावर त्यांनी दुरुस्ती केली. शहराच्या नामांतराचा ठराव उद्धव ठाकरे यांनी घाईगडबडीत घेतल्याचे सांगत आम्ही छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्याचे भुमरे म्हणाले.