आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील घरगुती गॅस कनेक्शन्सची तपासणी करण्याची माेहिम सर्वच गॅस एजन्सींकडून सुरु करण्यात आली आहे. त्यात एजन्सीचे कर्मचारी प्रत्येक ग्राहकाच्या घरी जाऊन शेगडी, पाईपलाईनची तपासणी करत आहेत. त्यासाठी शुल्क घेतले जात आहे. तपासणी करुन घेण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांना कनेक्शन बंद करण्याची धमकीही दिली जात आहे. विशेष म्हणजे या शुल्काचे दरही वेगवेगळे आहेत. गारखेडा परिसरातील एचपीच्या रेणुका गॅस सर्व्हिसेकडून प्रति ग्राहक २३६ रुपये, तर सिडकोत १०० रुपये आणि भारत, इंडेन गॅस एजन्सीकडून १५० रुपये सर्व्हिसिंग चार्ज घेतला जात आहे. या बदल्यात शेगडी, नळी, रेग्युलेटर आणि गॅस चालू-बंद करण्याच्या बटणांची तपासणी केली जाते. यातील खराब झालेल्या साहित्य बदलण्यासाठी वेगळे शुल्क घेतले जाते. यावरुन काही ठिकाणी कर्मचारी व ग्राहकात वादही होत आहेत.
सध्या गॅस सिलिंडरच्या किमतीत तिप्पट वाढ झाल्याने ग्राहक मेटाकुटीला आले. त्यात गॅस कंपनीकडून ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार सेवा देण्याऐवजी एजन्सीकडून सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमधून संताप वाढला आहे. इंडेन १५०, तर एचपी २३६ रुपये का घेतात, असा प्रश्न उपस्थित करत सर्व्हिसिंगला नकार दिला जात आहे. त्यामुळे एजन्सी कर्मचारी गॅस कट करण्याची धमकी देत असल्याने काही ग्राहकांनी सांगितले.
‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने इंडेन एजन्सीच्या ४ ठिकाणच्या कार्यालयात चौकशी केली असता सर्वत्र १५० रुपये घेत असल्याचे सांगितले. आम्ही सर्व्हिसिंग केली तरच ग्राहकांकडून शुल्क घेताे, असे तेथील कर्मचारी आबासाहेब राऊत म्हणाले.
सर्व्हिसिंग चार्जेस २३६ रुपये घेतोय कंपनीकडून गॅस सर्व्हिसिंगच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार ग्राहकांच्या घरी जाऊन तपासणी करतो. त्यासाठी प्रति ग्राहकाकडून २३६ रुपये शुल्क घेत असल्याचे गारखेडा परिसरातील एचपी एजन्सीचे चेतन जाधव यांनी सांगितले. सिडकोच्या एजन्सीतील जितेंद्र कक्कर यांनी आम्ही १०० रुपये घेत असल्याचे सांगितले. एकाच कंपनीच्या दोन एजन्सी वेगवेगळे शुल्क आकारत आहेत. याच एजन्सीचे काही कर्मचारी ग्राहकांना जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला.
गॅस कनेक्शन कट करण्याची धमकी एचपी गॅस एजन्सी कर्मचारी इंगळेने आमच्या घरी येऊन सर्व्हिस चार्जच्या नावाखाली २३६ रुपये घेतले. याबाबत विचारणा केली तर समाधानकारक उत्तर दिले नाही. माझ्या शेजारच्या ग्राहकांनी नुकतेच नवीन कनेक्शन घेतले. नवे कनेक्शन असल्याने विमाही आहे. त्यामुळे त्यांनी सर्व्हिसिंग करण्यास नकार दिला. इंगळेने ऑफिसमध्ये फोन करून सर्व्हिस चार्ज भरत नसल्याने त्यांचे कनेक्शन कट करा, अशी धमकी दिली. याकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी. -राजू जाधव, ग्राहक, विष्णूनगर, गारखेडा परिसर
साडेनऊ लाख ग्राहक, १७.३७ कोटींचा भुर्दंड शहर व जिल्ह्यात साडेनऊ लाख ग्राहकांची संख्या आहे. एचपी २३६, इंडेन १००, तर भारत गॅस १०० ते १५० रुपयांप्रमाणे सर्व्हिसिंगसाठी ग्राहकांना सरासरी १७.३७ कोटींवर खर्च येणार आहे. तसेच साहित्य बदलून घेतल्यास खर्चात वाढ होईल.
आम्हाला सरकारची परवानगी भारत सरकारने गॅस कंपनीला मेंडेटरी इन्स्पेक्शनसाठी प्रति ग्राहक २३६ रुपये शुल्क घेण्याची परवानगी दिली. मात्र, एजन्सी ग्राहकांचा विचार करून वेगवेगळे शुल्क घेत आहे. याबाबत एजन्सी चालकांना सक्त सूचना केल्या जातील. सर्व्हिसिंग न करता शुल्क आकारणे चुकीचे आहे. - नीलेश लठ्ठे, सेल्स अधिकारी, औरंगाबाद विभाग, भारत गॅस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.