आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा:महावितरणच्या पॉवर अॅपवरून मिळवा वाहनांच्या चार्जिंग सेंटरची माहिती ; हजारो ई-वाहन चालकांसाठी ठरतेय उपयुक्त

छत्रपती संभाजीनगर / संतोष देशमुख15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने ई-व्हेइकल धोरण लागू केल्यानंतर अाता ई-वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, चार्जिंग सेंटरबाबत वाहनधारक अनभिज्ञ असतात. त्यांच्या सोयीसाठी महावितरणने शहरात स्वत:चे चार्जिंग सेंटर उभारले आहेत. तसेच खासगी चार्जिंग सेंटरला वीजपुरवठा केला जातो. त्या सर्व अडीच हजार सेंटरची माहिती चालकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी पॉवर अॅपची निर्मिती केली आहे.

महावितरणने ‘इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारणीसोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ‘पॉवर अॅप’ नावाचे मोबाइल ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनधारक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधता येते. चार्जिंगचे पैसे ऑनलाइन भरण्याची सोय अाहे. महावितरणसह खासगी चार्जिंग स्टेशनचीही माहिती अॅपवरून मिळते.

असा करा वापर : पॉवर अॅप या मोबाइल ॲप्लिकेशनमधील ‘मॅप मी’ या सुविधेच्या आधारे महावितरण तसेच अन्य कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते. हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये वापरता येते. या ॲप्लिकेशनवर अडीच हजार खासगी व महावितरणची चार्जिंग स्टेशन्स जोडली गेली आहेत.

दोन चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौक उपकेंद्र व चिकलठाण्यातील बेडसे पेपर मिल उपकेंद्राच्या आवारात महावितरण दोन चार्जिंग सेंटर उभारत अाहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचबरोबर एसटी महामंडळाच्या विभाग कार्यालयाच्या पाठीमागे व सिडको बसस्थानकावर दोन चार्जिंग सेंटर आणि खासगी सेंटरही सुरू होत आहेत.

महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडवण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन अवॉर्ड २०२३’ मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. वीज, पाणी, वायू आणि विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या कंपन्यांना हे पुरस्कार दिले जातात. महावितरणला ‘इमर्जिंग इनोव्हेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन’ या वर्गवारीत विजेता म्हणून पुरस्कार मिळाला.

महावितरण नोडल एजन्सी केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, वेब पोर्टल आणि मोबाइल ॲप विकसित करणे असे विविध उपक्रम महावितरणने हाती घेतले आहेत. महावितरणच्या कार्यालयात आणि सबस्टेशन्समध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी उभारण्यात आली आहेत. ती मनुष्यबळाशिवाय चालतात.

बातम्या आणखी आहेत...