आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तक्षशिलानगरात राहणाऱ्या कविता संतोष मुगद नावाच्या एका महिलेने घाटी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी जन्माला आलेले बाळ पळवले. मंगळवारी (२३ फेब्रुवारी) ही घटना घडली. पण पोलिसांनी तासाभरातच या महिलेला शोधून बाळाला पुन्हा आईच्या कुशीत दिले. बेगमपुरा पोलिसांनी बाळ शोधून आणताच या मातेला अश्रू अनावर झाले. बाळ चोरणारी कविता ही मूळची आडगावातील रहिवासी असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता तिला तिच्या पतीने सोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भीक मागण्यासाठी म्हणून तिने हे बाळ चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेवासा तालुक्यातील चांदा गावातील सोनाली दिगंबर हारळे यांनी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता गोंडस मुलाला जन्म दिला. पती मजूर असलेल्या सोनालीला आधीचा अडीच वर्षांचा मुलगा अाहे. अाता दुसऱ्या प्रसूतीसाठी ती माहेरी औरंगाबादजवळच्या लिंबेजळगावात आली होती. रविवारी तिला भावाने घाटीत दाखल केले. साेमवारी सकाळी तिने मुलाला जन्म दिला. तिच्यासोबत असलेली आई मंगळवारी रुग्णालयातून सामान खरेदी करण्यासाठी बाहेर गेली. साडेसात वाजेच्या सुमारास सोनालीही बाळाला गादीवर झोपवून बाथरूमला गेली. परतताच तिला बाळ गादीवर दिसले नाही. सोनालीने विचारपूस सुरू केली. कर्मचारी, डॉक्टरांना काहीच कल्पना नव्हती. पण एका परिचारिकेने एक महिला बाळाला घेऊन बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर घाटीकडून बेगमपुरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
भिकेसाठी वापरून नंतर बाळ विक्रीचाही कट?
पोलिसांनी आरोपी महिलेकडून बाळ ताब्यात घेतले व घाटीतील परिचारिकांकडे सोपवले. त्यांनी
तत्काळ बाळाला तपासले. सुदैवाने त्याला कुठलीही इजा झालेली नव्हती. आजीने बाळाला कुशीत घेतले व त्या रुग्णालयात गेल्या. मुलगी सोनालीला बाळ देताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यानंतर पोलिसांनी कविताला अटक केली. तिला पतीने सोडलेले असून बाळ जवळ असल्यावर मोठ्या प्रमाणावर भीक मिळते म्हणून तिने बाळ चोरल्याचा संशय आहे. काही दिवसांनी तिने बाळ कुठेतरी विकले असते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
रिक्षाचालकाची मदत
बेगमपुरा ठाण्याच्या उपनिरीक्षक ज्योती गात, अंमलदार कांतीलाल भोज, अंबादास राठोड, जगन्नाथ दांडेकर यांनी परिसरात चाैकशी केली. तेव्हा रिक्षाचालक उस्मान खान यांनी मी एका बाळ असलेल्या महिलेला जाफरगेट येथील तक्षशिलानगरात सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी उस्मान, दोन परिचारिका व सोनालीच्या आईला सोबत घेतले. तक्षशिलानगरात चौकशी करताच एकाने मीना बिरारे हिच्या घरात एक महिला बाळाला घेऊन जाताना पाहिल्याचे सांगितले. पाेलिस त्या घरात गेले तेव्हा बाळ चोरून नेल्यानंतर कविता गाढ झोपी गेलेली दिसली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.