आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) अतिक्रमणांचा विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा परिसर संरक्षित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून घाटीच्या मालकीच्या जागेची मोजणी करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर घाटीत सुमारे दीड किलोमीटर संरक्षक भिंत बांधण्यासाठीचा मार्ग मोेकळा होणार आहे. त्याचबरोबर अतिक्रमित जागादेखील घाटीला परत मिळणार आहे. घाटीच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक अतिक्रमणे आहेत. त्यामुळे त्याचा फटका घाटीच्या परिसरालाही बसतो. त्यामुळे घाटी प्रशासनाने संरक्षक भिंतीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूरदेखील करण्यात आला होता. त्यामधून या भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. घाटीचा परिसर ९९ एकरांचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर सुमारे ९९ एकरांचा आहे. ‘घाटी’ची स्थापना १५ अाॅगस्ट १९५६ रोजी झाली. सुरुवातीला छावणीतील निजाम बंगला येथे महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्या वेळी नेत्ररोग, संसर्गजन्य आजार आणि प्रसूतिशास्त्र हे विभाग आमखास मैदान येथील इमारतीत होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते २७ अाॅक्टोबर १९५७ रोजी घाटीच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री सुशीला नय्यर यांच्या हस्ते २० जून १९६४ रोजी घाटीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी सुमारे ९९ एकरांवर रुग्णालय व महाविद्यालयाच्या ३० विविध इमारतींची उभारणी करण्यात आली.
आठवडाभरात होणार मोजणी घाटीच्या संरक्षक भिंतीचीही मोजणी सुरू करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, ‘सुपर स्पेशालिटी’चे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी, अभ्यागत समिती सदस्य इक्बालसिंग गिल यांच्यासह इतर समिती सदस्यदेखील उपस्थित होते. आठवडाभरात मोजणीचे हे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले
मोजणीनंतर कळेल अतिक्रमणांची स्थिती
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. एम. आय. सय्यद यांनी सांगितले की, घाटीची संरक्षक भिंत २,९००मीटर लांबीची आहे. सध्या सुमारे १,४०० मीटरच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. काही ठिकाणी पूर्वीची भिंत सुस्थितीत आहे. तेथे नवी भिंत बांधण्यात येणार नाही. केवळ पडलेली भिंत नव्याने उभारली जाईल. त्याचबरोबर या मोजणीमुळे घाटीच्या किती जागेवर अतिक्रमणे केलेली आहेत, हे देखील कळेल. त्यामुळे संरक्षक भिंत बांधताना अडचणी येणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.