आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक:दृष्टिहीनांसाठी चष्मा; दीड फुटावरील अडथळ्याचा वाजणार बझर

संतोष उगले |औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दृष्टीहिनांना एका जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काहीवेळा तर इतरांची मदत घेऊन काही काम किंवा रस्ता ओलांडावा लागतो. एवढेच नव्हे, तर त्यांना दैनंदिन जगण्यातल्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन बजाजनगरातील राजा शिवाजी कनिष्ठ कॉलेजमधील स्वत: ८० टक्के दृष्टीहिन असणाऱ्या मोहितसिंग राजपूत (१७, रा. महात्मा फुलेनगर, पंढरपूर) या बारावीतील विद्यार्थ्याने चष्मा तयार तयार केला आहे.

त्याने “थर्ड आय’ या नावाने सादर केलेल्या प्रयोगाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाले. स्वतःच्या आयुष्यातील अंधार, त्यातून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याने हा प्रयोग केला व तो यशस्वी ठरला आहे.मोहितसिंगला नियमित १ किमी अंतरावरून कॉलेजला जावे लागते. त्या वेळी येणाऱ्या अडचणीतून त्याला एक कल्पना सुचली आणि त्यांतूनच “थर्ड आय’चा जन्म झाला, असे तो सांगतो.

काय आहे थर्ड आय?
चष्मा, आरडीनो युनो, अल्ट्रासोनिक सेन्सर, जंपर वायर, ९ वॅट बॅटरी, स्मॉल स्विच, एलईडी लाइट आणि बझर या सर्व वस्तूंच्या वापरातून त्याने थर्ड आय नावाने प्रकल्प तयार केला. शून्य ते दीड फुटाच्या अंतरावरील ऑब्जेक्ट (वस्तू) येताच हा बझर व्हायब्रेट होतो, शिवाय लाइट लागून आवाजही देतो. दृष्टीहिनांसोबत एखाद्या बहिऱ्यासही थर्ड आयचा वापर करता यावा, म्हणून त्यात व्हायब्रेटची सिस्टिम जोडली आहे. आगामी काळात शिक्षकांच्या मदतीने या प्रोजेक्टसाठी पेटंट मिळवणार असल्याचे त्याने सांगितले.

वजन कमी करण्यासाठी नॅनाे तंत्रज्ञान वापरणार
सध्या चष्म्याचे वजन १२० ग्रॅम आहे. कमी करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान, चार्जेबल बॅटरी वापरणार आहे. चष्म्याऐवजी शर्टच्या कॉलरला अडकवता येईल अशी सुविधा करणार आहे. चष्म्यासाठी ९०० रुपये खर्च व दोन ते तीन तास लागले. दृष्टीहिनांच्या हातातील काठीवर सेन्सर बसवून पाणी, खड्डा आणि जिन्यातील पायऱ्यांची अचूक माहिती घेणारी मॅजिक स्टिक बनवणार आहे. दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी तिसरा डोळा म्हणून हा चष्मा उपयोगी ठरणार असल्याचेही मोहितसिंगने सांगितले. त्याचे मित्र रोहन निकाळे, कार्तिक नेताजी, करण राजपूत, कोमल इंगळे यांची मदत झाली. एकनाथ जाधव, प्राचार्य डॉ. एस. एस. कादरी, माधुरी बहिरट, मयूरी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले.

जि.प.२३, तर माध्यमिकच्या २७ शाळांचा होता सहभाग
प्रदर्शनात प्राथमिक गटात २३ शाळांचा सहभाग होता. यात जोगेश्वरी जि.प. शाळा प्रथम, श्री साईनाथ विद्यालय, वाळूज द्वितीय तर, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय, वसू सायगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात २७ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय प्रथम, तर राजर्षी शाहू विद्यालय, रांजणगाव द्वितीय व जि.प. शाळा, रांजणगावने तृतीय क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...