आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जागतिक तापमानवाढ, हरितगृह वायू परिणामाने ‘ला निना’ला चकवले; ऐन हिवाळ्यात थंडी गायब, जानेवारीपासूनच राज्याचा पारा चाळिशीत

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 11 वर्षांतील यंदाचा मार्च सर्वात ‘हॉट’, सरासरी 1.41 अंश तापमान वाढले

ऑक्टोबर २०२० पासून प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती आहे. या स्थितीत भारतासह जगात हिवाळ्यात जास्त थंडी पडते. मात्र या वेळी थंडी पडलीच नाही. उलट जानेवारी, फेब्रुवारी उष्ण ठरले. मार्चमध्ये अनेक ठिकाणी पारा चाळिशीत गेला. गेल्या ११ वर्षांतील सर्वात उष्ण मार्चची नोंद झाली, तर २०२० हे सलग पाचवे उष्ण वर्ष ठरले. राज्यात जानेवारीपासून पारा चढा राहिला असून यंदाचा उन्हाळाही कडक राहण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानवाढ, हरितगृह वायू उत्सर्जन आणि स्थानिक हवामानातील बदलाने यंदा ‘ला निना’ लाही चकवल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले.

प्रशांत महासागरात ऑक्टोबर २०२० पासून ‘ला निना’ स्थिती आहे. या स्थितीत महासागराचे पृष्ठीय तापमान ३ ते ५ अंशांनी कमी असते. परिणामी भारतात चांगला पाऊस, कडाक्याची थंडी व सौम्य उन्हाळा जाणवतो. यंदा विसंगत घडले. मान्सून लांबला, थंडी पडलीच नाही. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये १० राज्यांतील कमाल तापमान ५ अंशांनी जास्त झाले. राज्यातही मार्चमध्येच विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या आसपास राहिला.

हरितगृह वायूंचा परिणाम
वाढते प्रदूषण, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन यामुळे ‘ला निना’ जाणवला नाही. त्यातच स्थानिक पातळीवर हवेचे दाब सातत्याने बदलत राहिल्याने ऐन हिवाळ्यात उन्हाळा अशी स्थिती अनुभवास आली. आगामी काळातही असेच चित्र राहील. -डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ

ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम
‘ला निना’ आता विरत चालला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस वायूचे वाढते उत्सर्जन व स्थानिक हवामानातील बदल यामुळे यंदा थंडी जाणवली नाही. त्यातच वाऱ्यांचे पॅटर्न बदलले, त्यामुळे यंदा तापमानात वाढ दिसते आहे. - डॉ. डी. एस.पै, प्रमुख, क्लायमेट रिसर्च, पुणे

राज्यात पावसाची शक्यता
राज्यात मराठवाडा ते कोमोरीन परिसर तसेच तामिळनाडू व कर्नाटकदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. परिणामी शुक्रवारपासून (९ एप्रिल) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट असून चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ९ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...