आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वासाचा तिढा:व्हेंटिलेटर्सपुढे दिल्लीही हतबल; कंपनीचे प्रतिनिधी, पुर‌वठादारांचा प्रयत्न अयशस्वी; डॉक्टरांनीही टेकले हात

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीचे तंत्रज्ञ-डॉक्टरांमध्ये चर्चेतून समेट घडवण्याचा प्रयत्नही फसला

सुमारे दीड महिन्यापूर्वी पीएम केअर फंडातून कोरोना रुग्णांसाठी घाटी रुग्णालयात आलेल्या व्हेंटिलेटर्सचा घोळ अजूनही संपलेला नाही. हे व्हेंटिलेटर्स सुरू करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या डॉक्टरांनी बरीच खटपट करून पाहिली. पण त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी हात टेकून खासगी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सची तपासणी करण्याचे ठरवले.

१२ एप्रिल रोजी एका ट्रकमधून औरंगाबादेत ज्योती सीएनसी कंपनीचे १०० व्हेंटिलेटर दाखल झाले. त्यातील काही घाटी रुग्णालयाला तर काही परभणी, हिंगोली जिल्हा रुग्णालयांना देण्यात आले. त्याच वेळी ते निरुपयोगी असल्याचे वृत्त सर्वप्रथम दिव्य मराठीने दिले. ते पुढे तंतोतंत खरे ठरले. राज्यस्तरावर राजकीय वादावादी झाली. कोरोना रुग्णांसाठी यातील एकही व्हेंटिलेटर कामाचे नाही, असे घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर ज्योती कंपनीच्या अभियंत्यांनी ते सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावरील एका वृत्तवाहिनीने दिले. दरम्यान, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने व्हेंटिलेटर दुरुस्त करणार की नवीन देणार, अशी विचारणा केंद्र सरकारकडे केली.

केंद्राचा असाही दावा

केंद्राचे वकील अॅड. अजय तल्हार यांनी खंडपीठात शपथपत्र दाखल करून हे व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातील नाहीत, असा दावा केला. जागतिक दर्जानुसार तयार केलेल्या व्हेंटिलेटर्सची हाताळणी करणारे तज्ज्ञ डॉक्टर घाटी रुग्णालयाकडे नाहीतच, असेही त्यांनी म्हटले होते. हस्तक्षेप करणे टाळले

औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, दिल्लीहून आलेल्या पथकाला आम्ही व्हेंटिलेटर्स दाखवले. त्यांच्या कामात हस्तक्षेप नको. त्यांना निःपक्षपातीपणे काम करता यावे यासाठी आम्ही व्हेंटिलेटर दाखवून आमच्या कामाला निघून गेलाे हाेताे.’ न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (३ जून) दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील डॉ. रूपेश यादव आणि डॉ. अरीन चौधरी घाटीत आले.

चार तास त्यांनी बराच खटाटोप केला. पण त्यांनाही एकही व्हेंटिलेटर सुरू करता आले नाही. तत्पूर्वी २९ मे रोजी मुख्य सरकारी वकील, ज्योती कंपनीचे प्रतिनिधी, पुरवठादार आणि २६ डॉक्टरांच्या उपस्थितीत पाहणी झाली. त्यातही व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचेच समोर आले, तसा अहवाल त्यांनी दिला. १ जून रोजी ऑडिटर्सनी तंत्रज्ञ आणि डॉक्टरांत चर्चा घडवून आणून समेटाचा प्रयत्न केला. तोही फसला.

आम्ही बोलणार नाही
व्हेंटिलेटरचे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्राचे पथक पाहणीसाठी आले आहे. त्यासंदर्भात आम्ही काहीही बोलणे योग्य नाही. याप्रकरणी आता फक्त न्यायालय बोलेल, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

खासगीतही तपासणी
घाटीतील एकही व्हेंटिलेटर सुरू करणे अशक्य असल्याचे दिल्लीच्या डॉक्टरांना सायंकाळी लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी खासगी रुग्णालयांना दिलेल्या व्हेंटिलेटरकडे मोर्चा वळवण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी ते तेथे तपासणी करतील, अशी शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...