आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Godavari River Water Harmful | Marathi News | Jayakawadi Dam Aurangabad | Paithan Godavari River Water Update | Godapatra In Contaminated Water; River Water Is Harmful To Health Green Arbitration

दिव्य मराठी लक्षवेधी:दूषित पाण्याच्या विळख्यात गोदापात्र; नदीचे पाणी आरोग्यास अपायकारक- हरित लवाद

रमेश शेळके | पैठण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे हरित लवादाने म्हटले आहे. एकटे नाशिकच नव्हे, तर मराठवाड्यातील पैठणपासून नांदेडपर्यंत सर्वत्र गोदावरीचे पाणी दूषित होत आहे. पैठण, औरंगाबादसह वाळूज एमआयडीसीमधील केमिकलमिश्रित दूषित पाण्यामुळे जीवनदायिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जालना, बीड, परभणी, नांदेडमध्येही अशीच स्थिती झालेली दिसते.

पैठणमध्ये एक वर्षापासून जायकवाडीवरील वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने गोदावरीत वर्षभरापासून पाणी नाही. त्यामुळे सध्या गोदावरीत येणाऱ्या नाल्याच्या पाण्यात भाविक, वारकऱ्यांना स्नान करावे लागत असल्याचे भीषण वास्तव आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून दहा वर्षांपासून ४६ कोटी रुपये खर्च करून पैठण शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र ते पूर्ण झालेले नाही. मलशुद्धीकरण केंद्र शहराच्या बाहेर नगर परिषदेच्या जागेवर तयार केले जाणार आहे. शहरात जे आठ ते दहा नाल्यांचे दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जाते ते रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

बीड : ३२ गावांत होते जलप्रदूषण, पावसाळ्यात जल प्रदूषण जास्त
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ३२ गावच्या काठावरून ही नदी वाहते. शहरातील सांडपाणी परिसरातील ओढे, नाल्यात सोडण्यात येते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे हे पाणी गोदावरीच्या पात्रात जात असल्याने प्रदूषण होते.

परभणी : वीटभट्ट्यांचे पाणी नदीत
परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यांमधून गोदावरी नदी वाहते. शहराचे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नाले, ओढ्यांच्या माध्यमातून नदीत मिसळले जाते. जिल्ह्यातील कारखाने, नदी काठावरील वीटभट्ट्यांतूनही प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते.

शहागड : सांडपाणी थेट नदीपात्रात
अंबड तालुक्यातील शहागड येथे गावातील सांडपाणी चार ते पाच ठिकाणी नालीद्वारे वाहत जाऊन नदीपात्रात मिसळले जाते. याच नदीपात्रात गावातील ग्रामस्थ कधी अंघोळ करण्यासाठी जातात. शिवाय या गावातील नदीकाठावर शहागडसह बीड जिल्ह्यातील ग्रामस्थ दशक्रिया विधीसाठी येतात. त्यांनाही याच ठिकाणी या सांडपाणीमिश्रित घाण पाण्यात अंघोळ करावी लागते.

आपतगाव: भूमिगत गटार योजना बंद करावी
गोदावरीच्या उगमस्थानापासूनच दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. साधारणपणे १५० दलघमी दूषित, मलमिश्रित पाणी गोदावरीत सोडले जाते. यात भूमिगत गटार योजना बंद करणे आवश्यक आहे. नदीलगत कुठलेही कारखाने असू नयेत. पूर्वी तसा कायदा होता, परंतु फडणवीस सरकारच्या काळात तो कायदा रद्द केल्याने पात्रात कारखान्याचे रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. नागरिकांनीही काळजी घेतली तर जलप्रदूषण कमी होईल. विजय दिवाण, जलतज्ज्ञ.

नांदेड : प्रक्रिया न केलेले सांडपाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडतात, जिल्ह्यात दूषित पाण्याची समस्या कायम आहे.
एकट्या नांदेड शहरातील १८ मोठ्या नाल्यांचे पाणी प्रक्रिया न करता थेट गोदावरीत सोडल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. विविध घाटांवर फुले, हार आदी साहित्य टाकल्यानेही प्रदूषणात वाढ होते.

पैठण: भूमिगत गटार योजना फेल

पैठणमधील आठ ते दहा दूषित नाल्यांचे पाणी गोदावरीत सोडले जाते. भूमिगत गटार योजना फेल गेल्याचे चित्र असल्याने गोदावरीत जाणारे दूषित पाणी रोखता येईल असे वाटत नाही. दूषित पाणी नदीत सोडू नये यावर उपाययोजना करावी, अशी मागणी पैठणमधील सामाजिक-धार्मिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. मात्र त्याकडे नगर परिषद अथवा इतर प्रशासकीय यंत्रणेने लक्ष दिले नसल्याचा आराेप सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक, उमेश पंडुरे यांनी केला. पैठण शहरात मलमिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. ते रोखण्याच्या मागणीसाठी बालयोगी भागवतानंद स्वामी यांनी तहसीलसमोर उपोषण करून आत्मदहनाचा इशारा दिला, तरीही यावर कारवाई झाली नाही. दूषित पाणी सोडणे रोखावे, अशी मागणीही केली जात आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे आधीच नदीच्या पात्राची मोठी हानी झाली. त्यात दूषित पाणी सोडल्याने नदीचे अस्तित्व संपते की काय अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...