आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(मंदार जोशी)
लॉकडाऊनमुळे देशभर उद्योग क्षेत्र अडचणीत असले तरी संकट दूर झाल्यानंतर भारतातील उद्योजकांना व स्थानिक कामगारांना चांगले दिवस येतील. १२ प्रकारच्या उद्योगांना देशात नव्याने संधी आहे. सूत्रांनुसार, केंद्राने याचा अभ्यास सुरू केला असून आयात-निर्यातीचा आढावा घेऊन पुढील निर्णय होईल. ही स्थिती पाहता नवी उभारी घेणारे अनेक उद्योग औरंगाबादच्या ऑरिक सिटीत येऊ शकतात. औरंगाबादेतील चार एमआयडीसींमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार आहेत. इतर कामांवर दुसऱ्या राज्यातूनच आलेले मजूर आहेत. परराज्यातील हे मजूर व कामगार परतू लागल्याने स्थानिक कामगारांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. ज्याप्रमाणे कॉर्पोरेटमध्ये वर्क फ्रॉम होम हा ट्रेंड आहे तसाच उद्योग क्षेत्रात वर्क इन होमटाऊन ही मानसिकता मूळ धरेल.
उद्योजकांना या क्षेत्रात संधी :
मॉड्युलर फर्निचर, टाॅईज, फूड प्रोसेसिंग युनिट, रेडी टु इट फुड इंडस्ट्री, शेतीसाठी लागणारे रसायने, मॅन मेड फायबर, एअर कंडिशनर, कॅपिटल गूड, औषध निर्मितीसाठी लागणारे यंत्र, चामड्याच्या कारखान्यात लागणारी रसायने, अॅटो कंपोनंट या क्षेत्रात उद्योजकाना नवीन संधी मिळतील. हे कारखाने औरंगाबाद ऑरिक सिटीत येण्यास संधी आहे. भारत अधिक निर्यात किंवा आयात कशाची करतो त्यावरही अभ्यास सुरू आहे.
कंत्राटी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज
उद्योग क्षेत्रात अधिकाऱ्यांबरोच कुशल व अकुशल हे दोन्ही कामगार लागणार आहेत. अगदी सातवी पास तरुणालादेखील नोकरीची संधी मिळू शकते. त्यांना ५ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. काही उद्योजकांच्या मते, ज्याप्रमाणे परप्रांतीय कामगार अंग झोकून काम करतो त्याचप्रमाणे स्थानिक कामगारांनीदेखील काम करायला हवे. मेहनत, काम करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गोष्टी उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. वाळूज परिसरात सध्यादेखील स्थानिक कामगारांची भरती सुरू आहे. आयटीआयच्या वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशन हा ट्रेड शिकलेल्या तरुणांना औरंगाबादेतील एमआयडीसीत चांगली मागणी आहे.
संकटात संधी
लाॅकडाऊनमुळे जरी उद्योग क्षेत्र काही प्रमाणात अडचणीत असले तरी लॉकडाऊननंतर कामगार आणि उद्योजक या दोघांसाठी अनेक संधी निर्माण होणार आहेत. स्थानिक कामगारांना खूप चांगले दिवस येणार आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांनी यासाठी तयारी करायला हवी. - आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.