आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज ग्राहकांसाठी खुशखबर:दोन हप्त्यांमध्ये मिळेल बिलाच्या सुरक्षा ठेवीवर व्याज परतावा, महावितरणचा निर्णय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण वीज जोडणी देताना ग्राहकांकडून सुरक्षा ठेव घेते. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील ३८ लाख ३४ हजार १३१ वीज ग्राहकांनी सुरक्षा ठेव भरली आहे. यावर गत आर्थिक वर्षात २१ कोटी ४९ लाख २० हजार रुपये व्याजाचा परतावा वीज बिलाच्या माध्यमातून दोन हप्त्यांत देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारी आणि सिंगल फेज, थ्रीफेज, विद्युत भार आदी बाबी लक्षात घेऊन सुरक्षा ठेव आकारली जाते. विद्यमान वीज ग्राहकांसाठी मागील १२ महिन्यांतील वीज देयकाची सरासरी काढून एक महिन्याची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. १ एप्रिल २०२२ पासून नवीन नियमावलीनुसार आता दोन महिन्यांची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येत आहे. मागील १२ महिन्यांतील वीज देयकांची सरासरी महत्त्वाचा घटक असल्याने वीज वापर हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

महावितरणचे अनेक ग्राहक अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देताच स्थलांतर करतात. अनेक जण स्वत:च कनेक्शन बंद करतात आणि थकीत वीज बिल भरत नाहीत. दुसरीकडे महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांपर्यंत वाटप होईपर्यंत साधारण दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागतो. तरीही महावितरणकडून अखंड वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे सुरक्षा ठेव गरजेची आहे. म्हणून एक महिन्याऐवजी आता दोन बिलांची रक्कम जमा करून घेतली जात आहे. १२ महिने वेळेत व नियमित वीज बिल भरणाऱ्याच्या सुरक्षा ठेवीवर बँकेतील व्याजदराप्रमाणे व्याजही दिले जाते. या बिलाची रक्कम भरण्यासाठी ६ मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. औरंगाबाद परिमंडळात १३ लाख १२ हजार ९७२ वीज ग्राहकांना ७ कोटी ९७ लाख २७ हजार रुपये सुरक्षा ठेव रकमेवर व्याज देण्यात येणार आहे. लातूर परिमंडळात १३ लाख ९५ हजार ५१ वीज ग्राहकांना ७ कोटी ६० लाख ५० हजार रुपये सुरक्षा ठेव रकमेवर व्याज देण्यात येणार आहे. नांदेड परिमंडळात १२ लाख २६ हजार १०८ वीज ग्राहकांना ५ कोटी ९१ लाख ४३ हजार रुपये सुरक्षा ठेव रकमेवर व्याज देण्यात येणार आहे. असे एकूण महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३८ लाख ३४ हजार १३१ वीज ग्राहकांना २१ कोटी ४९ लाख २० हजार रुपये सुरक्षा ठेवीवर व्याजाचा परतावा वीज बिलाच्या माध्यमातून मे व जूनमधील वीज बिलांमध्ये समायोजित करण्यात येत आहे.

महावितरणने घेतली ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल
सुरक्षा ठेवीची रक्कम वसूल केली जाते. पण ती रक्कम आणि त्यावरील व्याज परतावा कधी परत केला जातो, याबाबत ग्राहक अनभिज्ञ असतात. त्यामुळे याची सखोल चौकशी व आॅडिट व्हावे, अशा मागणीचे वृत्त ‘दैनिक दिव्य मराठी’ने २८ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची महावितरणने दखल घेतली असून आता वीज ग्राहकांना दोन हप्त्यांत वीज बिलाच्या सुरक्षा ठेवीवर व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...