आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचा दौरा:राज्यपाल कोश्यारी म्हणतात.. ‘मीडिया से मुझे डर लगता है!’; नांदेड भेटीने मराठवाडा दौरा सुरू, आज हिंगोलीत

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माध्यमेही राजकारणच करतात

राज्याचा सेवक म्हणून काम करताना जास्तीत जास्त ठिकाणी जाणे, लाेकांशी भेटणे मला आवडते. यानिमित्ताने खूप काही शिकायलाही मिळते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी केले. वादग्रस्त ठरलेला राज्यपालांचा दाैरा गुरुवारी नांदेड येथून सुरू झाला. वाद निर्माण झालेल्या अल्पसंख्याक मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करणे त्यांनी टाळले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमावेळी मात्र त्यांनी “मुझे मीडिया से डर लगता है...’ अशी मिश्कील टिप्पणी करत छायाचित्रासाठी पोझ दिली.

दौऱ्यात नियोजित नसतानाही राज्यपालांनी थेट गणित संकुलाच्या इमारतीवर जात विद्यापीठातील जलसंधारणाच्या सर्व कामांची पाहणी केली. कोश्यारी यांचे गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता विद्यापीठात आगमन झाले. या वेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. सिनेट सभागृहातील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, राम-कृष्ण यांच्याप्रमाणेच गुरू गोविंदसिंग हे मला सदैव श्रद्धास्थानी आहेत. त्यांचे निर्वाण या भूमीत झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या संतांची ही भूमी आहे. त्यामुळे हे स्थान प्रेरणादायी आहे. असे सांगून नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या निर्माणासाठी असल्याचे त्यांनी म्हटले.

कोरोनामुळे राज्यपालांनी गुरुद्वाऱ्यात न जाता पायरीचे दर्शन घेतले. श्री गुरू गोविंदसिंगजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीस माझी यायची मनोमन इच्छा होती. त्या इच्छेने मला इथे येता आल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, राज्यपालांच्या दौऱ्यामुळे सुरक्षेसाठी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुकाने काही काळ बंद ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांत संताप होता.

माध्यमेही राजकारणच करतात
माध्यमांशी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत कुठे जाता आले नाही. सध्या कोरोना कमी आहे. त्यामुळे नांदेड पाहण्यासाठी आलो आहे. दौऱ्यावरून होत असलेल्या राजकारणावर विचारले असता “आपणही राजकारणच करत आहात ना...’ असे माध्यमांना उद्देशून त्यांनी म्हटले.

आज हिंगोली, परभणी दौऱ्यावर
राज्यपाल शुक्रवारी (दि.६) हिंगोली व परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. हिंगोली येथे सकाळी ११ वाजता विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परभणीकडे रवाना होतील. तिथेही दुपारी अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...