आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण तापलं:राज्यपाल कोश्यारींनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न थेट मोदींसमोर मांडला, नेत्यांच्या उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या पाणीप्रश्नासंबंधी थेट राज्यपालांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. यावर विविध भाजप आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान देशाचे पालक पाणीप्रश्नात लक्ष घातले तर बिघडले कुठे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. तर राज्यपालांनी शिष्टाचार मोडल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

शहराच्या पाणीप्रश्नावर भाजपचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 8 जून रोजीच्या सभेतही पाणीप्रश्नावर सतरा मिनिटे त्यांना बोलावे लागले. राज्यपालांनी 10 दिवसातून एकदा पाणी औरंगाबादच्या नागरिकांना मिळते. यात सुधारणा व्हायची असेल तर मोदींनी लक्ष घालावे असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समक्ष विनंती केली. मोदी है तो मुमकीन है असे राज्यपालांनी सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर आपले मत व्यक्त केले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता त्यांनी यात गैर काहीच नसल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद भारताचा भाग असून देशातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. आपणही अनेकवेळा पाणीपुरवठा योजनेस निधी देण्यासंबंधी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. राज्य शासन अथवा महापालिका यासाठी प्रस्ताव पाठवत नाही.

श्रेय केंद्राला जाईन म्हणून प्रस्ताव नाही - आ. सावे

शहराच्या नागरिकांचे दुर्देव आहे की, नवीन 1680 कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी केली, त्याप्रमाणे ठेवली नाही. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेतील अटी शर्थी बदलल्या. महापालिकेने एक तृतीयांश रक्कम भरावी, अशी नवीन अट घालण्यात आली. राज्याने योजनेला निधी देण्याची गरज होती. पंतप्रधानांनी दखल घेतली असेल तर शहराचा पाणीप्रश्न निश्चितच लवकर सुटेल.

राज्यपालांकडून शिष्टाचाराचे भंग - आ. सतीश चव्हाण

राज्यात केवळ औरंगाबाद शहरालाच आठ दिवसातून एकदा पाणी येत नाही. लातूर, परभणी, बीड आदी शहरांच्या पाण्याच्या समस्या आहेत. राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची निवड अंतिम केली असती तर राज्यातील जनतेला त्यांच्या निधीमधून विविध योजना करता आल्या असता. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला लक्ष करण्यासाठी राज्यपालांनी पंतप्रधान यांच्याकडे पाणीप्रश्न उपस्थित केला असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

राज्यपालांचे अजाणतेपणाचे लक्षण - आ. दानवे

सोलापूर धुळे मनपात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. दोन्ही मनपा भाजपच्या आहेत. हल्ली औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर कुणीही उठते आणि बोलते. राज्यपालांचे अजाणतेपणाचे लक्षण आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. त्यावर राज्यपालांनी बाेलणे गरजेचे आहे. महागाईच्या प्रश्नावर बोलावे. केवळ शिवसेनेला टार्गेट करून प्रत्येकवेळी टोचून बोलण्याची सवय जडली आहे. गॅस, पेट्रोल, बेरोजगारी आदी प्रश्नावर बोलावे. माहिती घेऊन बोलावे हा जनतेचा आणि महाराष्ट्राचा अवमान असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...