आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता सुधार:जि.प. विद्यार्थ्यांची हुशारी तपासण्यासाठी 60 हजार शिक्षकांची परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभागीय आयुक्तांचे आदेश : ७ वर्षांनंतर ‘प्रथम’मार्फत जानेवारीत सुरू होणार उपक्रम, एप्रिलमध्ये मूल्यांकन

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याचे नेहमी म्हटले जाते. दोन आठवड्यांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना हतनूरच्या शाळेत याचा अनुभव आल्यावर त्यांनी दहा हजार जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांसोबत ६० हजार शिक्षकांचीही गुणवत्ता परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रथम या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. सात वर्षानंतर होणारा हा गुणवत्ता सुधार प्रकल्प जानेवारीत सुरू होईल. एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे. लातूरचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ऑगस्ट महिन्यात लातूरमध्ये मूल्यांकन केले होते. केले होते. त्याच धर्तीवर इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षकांची ज्ञानचाचणी होईल. केंद्रेकर यांनी बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

विभागीय आयुक्तांनी या उपक्रमाची जबाबदारी गोयल यांच्यावर दिली आहे. गोयल म्हणाले की, लातूरला ऑगस्टमध्य झालेल्या तपासणीत ४५ टक्के शाळांतील विद्यार्थ्यांना साधा भागाकारही करता येत नव्हता. आम्ही त्यांच्यात सुधारणा करत आहोत. त्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील खासगी संस्थांची मदत, मार्गदर्शन घेतले जात आहे. मूल्यांकनासाठी विविध अॅप तयार केले जातील. मुल्यांकनाचा आढावा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेता येईल. मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचाही प्रयत्न करू. आता विभागीय आयुक्तांनी सोपवलेल्या जबाबदारीनुसार जानेवारीत मुल्यांकन सुरु होणार होऊन एप्रिलपर्यंत ते पुर्ण होईल.

मूल्यशिक्षणाचे धडे दिले जावेत या बैठकीत केंद्रेकर यांनी मुलांना दररोजची प्रार्थना झाल्यानंतर मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची सुचना केली आहे. प्रामाणिकपणाचे महत्त्व त्यांना कळावे. कोणतीही गोष्ट शॉर्टकटने मिळवली तर ती टिकत नाही, हे त्यांच्या मनावर आताच कोरले गेले पाहिजे. ज्येष्ठांबाबत आदर ठेवून तो व्यक्तही करता आला पाहिजे. विविध शास्त्रज्ञांसह आदर्श व्यक्तिमत्त्वांची माहिती मिळाली पाहिजे. इतर दोन कामे कमी झाले तरी चालतील, मात्र मराठवाड्यातील शाळांचा दर्जा सुधारला गेला पाहिजे, असे केंद्रेकर म्हणाले.

असे केले जाते सर्वेक्षण आठ ते दहा ओळींचा उतारा आणि एक कथा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जाते. दुसरीच्या विद्यार्थ्यांना अंकसंख्या ज्ञान, वजाबाकी, तिसरीसाठी भागाकार अशी तपासणी होते. लेखन, वाचनाची तसेच व्यावहारिक ज्ञानाबाबत माहिती विचारली जाते. त्यानंतर त्यांच्यात काय सुधारणा होणे गरजेचे आहे हे सांगितले जाते. शिक्षकांसाठीही परीक्षेचे काही निकष, प्रश्न तयार केले आहेत. त्याचा तपशील लवकरच अंतिम केला जाईल. नुकतेच प्रथमच्या माध्यमातून छत्तीसगडचे सर्वेक्षण झाले आहे. सात वर्षांनंतर प्रथमच : प्रथम या संस्थेतर्फे देशभरात सर्वेक्षण होते. मराठवाड्यात ते २०१५-१६ मध्ये झाले होते. त्यानंतर प्रथमच असे सर्वेक्षण होत आहे. कोरोनामुळे गेली तीन वर्षे हा उपक्रम राबवण्यात आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...