आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:आज ग्रा.पं.ची निवडणूक; 67 हजार 673 उमेदवार आजमावणार नशीब, मराठवाड्यात प्रशासन सज्ज

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. छाया : नरेंद्र गडप्पा. - Divya Marathi
ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. छाया : नरेंद्र गडप्पा.

राज्यात आज, शुक्रवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असून प्रशासनाने याची जय्यत तयारी केली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. विभागात बहुतांश ठिकाणी दिग्गज उमेदवार नशीब आजमावणार असून अनेक ठिकाणी तर नात्या-गोत्यातील उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत चढली आहे. मतदारांनी आपल्याच पारड्यात मत टाकावे यासाठी उमेदवारांनी अनेक प्रकारची शक्कल लढवली आहे. आपल्या पॅनलचे वर्चस्व कायम राहावे यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यामध्ये तब्बल १०२ संवेदनशील गावे, पोलिसांचे लक्ष
जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतीत ३,२०० सदस्यपदांसाठी सुमारे ७५०० उमेदवार रिंगणात आहेत. १,२७६ बूथवर ५ लाख ५७३५६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात २.९१ लाख पुरुष, तर २.६५ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. ७,७०० अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी सज्ज आहेत. जिल्ह्यात १०२ संवेदनशील गावे आहेत. ३ पोलिस उपअधीक्षक, ९७४ पोलिस कर्मचारी, ५३९ गृहरक्षक दलाचे जवान, २ दंगा काबू पथक, १३ पोलिस निरीक्षक, ४५ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबाद रेल्वेचे ११० पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.

जालना : १ हजार ४८० बूथवर मतदान, अटीतटीच्या लढती
जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतींसाठी १२ हजार ३३२ उमेदवार रिंगणात आहेत. १ हजार ४८० बूथवर मतदान होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला या मूळ गावी होत असलेली निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. या ठिकाणी एकूण ग्रामपंचायत १३ सदस्यांपैकी ६ सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित ७ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. यात ३ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यानिमित्ताने मंत्री राजेश टोपे यांचे चुलत बंधू संभाजी टोपे व शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. भास्कर मगरे यांच्या पॅनल सदस्यांची समोरासमोर होत असलेली रंगतदार लढत पाहावयास मिळेल.

उस्मानाबाद : ४२८ ग्रामपंचायतींसाठी २,९३० उमेदवार रिंगणात
जिल्ह्यात एकूण ४२८ ग्रामपंचयातींसाठी २,९३० उमेदवार रिंगणात आहेत. ३९ ग्रामपंचायती व ६८५ जागा बिनविरोध आल्या आहेत. जिल्ह्यातील ओमराजेंचे आजोळ असलेले जागजी, माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे गाव अणदूर, कैलास पाटील यांचे सांजा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचे जि.प. मतदारसंघ सिंदफळ, माजी आमदार राहुल मोटे यांचे गिरवली, जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचे मतदारसंघ मंगरूळ, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे आष्टा जहांगीर आदी गावांतील निवडणुकांवर लक्ष लागले आहे.

आैरंगाबाद : ४,६९४ जागांवर निवडणूक : जिल्ह्यात ६१७ पैकी ३८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५७९ ग्रामपंचायतींसाठी २,२६८ मतदान केंद्रांवर मतदान हाेणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी चार ते पाच असे एकूण ११,३४० कर्मचारी तैनात असतील. ५७९ ग्रामपंचायतींच्या ४,६९४ जागांवर निवडणूक होत आहे. जिल्ह्यात ११,४९९ उमेदवार रिंगणात आहेत. साधारणत: १२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लातूर : केवळ २५ ग्रामपंचायती बिनविरोध : लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी ६ हजार ६८८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत, तर त्यातील २०२ सदस्य बिनविरोध निवडून आले. केवळ लातूर तालुक्यात १३२९ उमेदवार रिंगणात आहेत.

बीड : १११ ग्रामपंचायतींसाठी मतदान, १९३ जागा बिनविरोध
जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीत १०५१ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार होती. पण १९३ सदस्यांच्या जागा बिनविरोध आल्याने उर्वरित ८४२ जागांसाठी १ हजार ९२६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ४२४ मतदान केंद्रे आहेत, तर मतदारांची संख्या ही १ लाख ८० हजार १६३ आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून १६ जागांसाठी उमेदवारच मिळालेले नाहीत.

परभणी : ७ हजार ८६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा असेल कार्यरत
जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान हाेईल. नऊ तालुक्यांत १ हजार ५७३ मतदान केंद्रे आहेत. एकूण ७ हजार ८६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा असेल. ४ हजार ७१९ जागांसाठी ९ हजार ४३८ उमेदवार मैदानात आहेत. १ हजार ५३३ प्रभाग आहेत. ६ लाख ८२ हजार १७० मतदार आहेत.

नांदेड : पाच हजार मतदार असणारी १७ गावे
जिल्ह्यातील १,०१३ पैकी १०३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. यातील १६३८ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे आता ९१० ग्रामपंचायतीत ६,८६२ जागांसाठी १५,३६० उमेदवार रिंगणात आहेत. मुक्रमाबाद, बारड, मालेगाव, शिराढोण, कासराळी, सगरोळी, मारतळा, वाडी बुद्रुक, धनेगाव, वाजेगाव, इस्लापूर, बोधडी, तामसा, मांजरम, बरबडा, नर्सी, खानापूर, शाहापूर, माळाकोळी, लहान या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहेत. दरम्यान, तीन हजार पोलिस कर्मचारी, १४०० होमगार्ड, आरसीपीची सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ३२ संवेदनशील गावे आहेत. पाच हजार मतदार असणारी १७ गावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...