आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी तू पास झालीस:नातीने दिली आनंदवार्ता; शेतात राबून वयाच्या 60 व्या वर्षी हजराबी मॅट्रीक उत्तीर्ण

विद्या गावंडे / औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका परीक्षेत नापास झालो म्हणून तणावात येऊन आत्महत्या करणारे, कमी गुण मिळाले म्हणून निराश होणारे तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही घटना. शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते म्हणतात. त्याचाच प्रत्यय औरंगाबादमध्ये आज लागलेल्या दहावीच्या निकालात दिसून आला. आजी तू पास झालीस...तुला 55.88 टक्के गुण मिळाले. हे नातीचे वाक्य कानावर पडताच 60 वर्षांच्या हजराबींचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांचे डोळे आपसुकच पाणावले. शेतात खस्ता खावून या तरुण आजीने मिळवलेले यश इतरांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे. जिल्ह्यात या यशाची जोरदार चर्चा सुरूय.

शेतात काम करुन शिक्षण

हजराबी अहमद शेख. शेततात काम करतात. घर-संसार सांभाळून त्याही इतरांप्रमाणे नियमित प्रौढ महिला विद्यालयात जात होत्या. त्यांचे लग्न लवकर झाले. घरची परिस्थिती खूप बेताचीच; पण याही परीक्षेत त्यांनी शिक्षण घेत आपली आवड आणि जिद्द पूर्ण केली.

काय म्हणतात हजराबी

आपल्या या यशाबद्दल हजराबी म्हणतात, मला शिक्षणाची खूप आवड. लग्न झाल्यावर तरी आपल्याला शिकायला मिळाले पाहिजे असे वाटायचे. लग्नानंतर माझ्या पतीने मला साथ दिली. ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते, पण हल्ली प्रकृती बरी नसल्याने ते घरी असतात. पेपरच्या पहिल्या दिवशी तेच सोडवायला आले होते आणि आज उत्तीर्ण झाल्यावर त्यांनीच प्रथम पेढेही आणल्याचा प्रसंग अविस्मरणीय असल्याचा त्या म्हणाल्या.

नातही झाली उत्तीर्ण

पतीने साथ दिली म्हणून मी दहावीची परीक्षा प्रौढ महिला विद्यालय समर्थनगर येथून देऊ शकले. मला तीन मुले एक मुलगी आहे. आज माझ्या सोबत माझी नात सादिया मैनाज ही देखील 77 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिच्यासोबतच मी परीक्षेची तयारी केली, हे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.

आता लक्ष्य बारावी

आजी आणि नात दोघी पास झाल्याचा आनंद तर आहेच. आता पुढे बारावीपर्यंत शिकायची इच्छाही हजराबीने व्यक्त केली आहे. या आनंदात सिंहाचा वाटा आपल्या कुटुंबियांचा असल्याचेही हजराबी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. याबरोबरच प्रौढ महिला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमुळेच महिलांना चांगली संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हार के बादही जीत हैं

एका परीक्षेत नापास झालो म्हणून तणावात येऊन आत्महत्या करणारे, कमी गुण मिळाले म्हणून निराश होणारे तरुणही आसपास आपण पाहतो. त्यांना काय सांगाल असे विचारले असता हजराबी म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. पण हार के बाद भी तो जीत होती हैं, आयुष्य सुंदर आहे. इच्छा आणि मेहनत करा यश मिळते. नापास झालो म्हणून सर्व काही संपत नाही. मी शिकण्याची जिद्द बाळगली आणि वयाच्या साठीत उत्तीर्ण झाले,असे त्या आवर्जुन सांगतात.

बातम्या आणखी आहेत...